बेशिस्त वाहतुकीमुळेही स्वारगेट चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 19 जानेवारी 2020

सातारा रस्त्यावर अनधिकृत पार्किंग
सध्या स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याअंतर्गत सातारा रस्त्यावर पंचमी हॉटेल ते लक्ष्मीनारायण थिएटरदरम्यान बॅरिकेडचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे उड्डाण पुलावर जाण्यासाठी पंचमीपासून रस्त्याच्या डाव्या बाजूनेच (बीआरटी लेन वगळून) जावे लागत आहे. यापूर्वी वाहनचालक बीआरटी लेनमधून जाऊन उड्डाण पुलावर जात होते. मात्र, आता बंधने आल्याने पंचमी ते उड्डाण पूल यादरम्यान अरुंद रस्त्यावरून अधिक वाहने जात असून, त्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंग होत आहे.

पुणे - पदपथावर विविध वस्तू विकणारे व्यावसायिक, अंडाभुर्जीच्या गाड्या आणि दुकानातील सामान अगदी रस्त्यावरच मांडल्याने स्वारगेट येथील केशवराव जेधे चौक परिसरात पायी जाणाऱ्यांना मोठ्या गौरसोयीचा सामना करावा लागत आहे. या सर्व अतिक्रमणांवर करावाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वी पोलिसांनी स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बेशिस्त वाहतुकीमुळेही चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. हे सर्व प्रकार थांबविण्याबाबत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्वारगेट वाहतूक विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानंतर चौकातील अंडाभुर्जीचे गाडेही इतरत्र हलविण्यात आले होते, तर खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांना व अंडाभुर्जीच्या गाड्यांना पदपथावर थांबण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे काही दिवस या परिसराने मोकळा श्‍वास घेतला. मात्र, आता पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. बसथांब्यावर रिक्षा वाहतुकीचा अडथळा निर्माण करतात. परिणामी, स्वारगेट बसस्थानकात बस जात असताना स्थानकाचे प्रवेशद्वार ते चौकातील मुख्य सिग्नलपर्यंत कोंडी होते. शंकरशेठ रस्त्याचा सिग्नल सुटल्यावर रात्रीच्या वेळेला वाहनांच्या रांगा लागतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic jam in swargate chowk by wrong transport