esakal | चेंबर साफ करीत वाहतुक पोलिसाने पाण्याला करुन दिली मोकळी वाट !
sakal

बोलून बातमी शोधा

police

चेंबर साफ करीत वाहतुक पोलिसाने पाण्याला करुन दिली मोकळी वाट !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुरूवारी 9 सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजता कोंढवा परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे लुल्लानगर चौकात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठले. त्यामुळे वाहतुक संथ होऊन एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या.

अनेक दुचाकीस्वार खाली पडून जखमीही झाले. त्यावेळी वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी निखील नागवडे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः गुडघाभर पाण्यात उतरून काठीने व हाताने चेंबरवरील प्लॅस्टिक, कचरा, माती काढली. त्यानंतर काही मिनीटातच चौकातील पाणी ओसरले आणि 5-10 मिनीटातच वाहतुक कोंडी संपून रस्ता सुरळीत झाला. खाकी वर्दीत असूनही नागवडे यांनी बजावलेल्या या कर्तव्याचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारीत झाला आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला !

मागील काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यानुसार, गुरूवारी दुपारीही शहरात पाऊस झाला. कोंढव्याजवळील लुल्लानगर येथील चौकात तीव्र उतार असल्याने पावसाचे पाणी चौकात मोठ्या प्रमाणात साठते. गुडगाभर पाण्यातुन वाहने चालविताना वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडते. तर दुचाकीस्वार खाली पडून जखमी होण्याच्या घटना घडतात. गुरूवारी दुपारीही हाच प्रकार लुल्लानगर चौकात घडला. त्यावेळी कोंढवा वाहतुक शाखेमध्ये कार्यरत असणारो निखील नागवडे यांच्यावर लुल्लानगर चौकतील वाहतुक नियमनाची जबाबदारी होती. त्यांनीही अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे चौकात पाणी साठल्याचे पाहीले. त्यानंतर त्यांनी याबाबत महालिकेस खबर दिली. परंतु, बराच वेळ महापालिकेचे कर्मचारी तेथे पोचू शकले नाहीत. तसेच वाहनांच्याही दुरपर्यंत रांगा लागल्या. त्यामुळे 27 वर्षीय नागवडे यांनीच स्वतः काठी हातात घेऊन पाणी काढण्यास सुरूवात केली. चेंबरच्या झाकणांवरील प्लॅस्टिक, कचरा दूरच झाल्यानंतर काही वेळातच पाणी चेंबरमधून वाहून गेले. त्यानंतर काही मिनीटातच वाहतुकही सुरळीत झाली. दरम्यान, नागवडे हे काम करीत असतानाचा व्हिडीओ कोणीतरी काढला. तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. मुळचे वाघोली-वाडेबोल्हाई गावचे रहिवासी असलेले नागवडे हे 2016 मध्ये पुणे पोलिस दलात भरती झाले आहेत. दिड वर्षापासून कोंढवा वाहतुक शाखेत कार्यरत आहेत.

""कोणाची वाट पाहण्यापेक्षा आपणच पाणी काढू असे ठरविले. काठीने व हाताने चेंबरवरील प्लॅस्टिक, कचरा, माती काढली. त्यामुळे तत्काळ पाणी कमी झाले. वाहतुक सुरळीत झाल्याने आमच्यावरील ताणही कमी झाला.''

- निखील नागवडे, पोलिस कर्मचारी, कोंढवा वाहतुक शाखा.

loading image
go to top