चांदणी चौक येथील खडक फोडण्यासाठी अर्धा तास वाहतूक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदणी चौक येथील खडक फोडण्यासाठी अर्धा तास वाहतूक बंद

मुंबई-बंगळुरू मार्गावरील चांदणी चौक येथील पूल पाडल्यानंतर लेन वाढविण्यासाठी स्फोटकाने रस्त्यालगतचा खडक फोडण्यात आला.

चांदणी चौक येथील खडक फोडण्यासाठी अर्धा तास वाहतूक बंद

पिंपरी - मुंबई-बंगळुरू मार्गावरील चांदणी चौक येथील पूल पाडल्यानंतर लेन वाढविण्यासाठी स्फोटकाने रस्त्यालगतचा खडक फोडण्यात आला. यासाठी सोमवारी दुपारी दोन्ही बाजूची वाहतूक अर्ध्या तासासाठी बंद ठेवली होती. त्यामुळे या मार्गावर काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. फ़ुटलेले खडक हटविल्यानंतर लगेच वाहतूक सुरु केली.

वाहतुकीस अडथळा ठरणारा येथील रविवारी पूल पाडल्यानंतर आता लगतचे रस्त्यालगतचे खडक फोडायचे काम हाती घेतले आहे. यासाठी सोमवारी दोन ते अडीच यावेळेत चांदणी चौकापासून दोनशे मीटर अंतरावर वाहतूक थांबवली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या बाजूच्या खडकात २२ छिद्रे पाडून स्फोटक भरली होती. स्फोटाने खडक फोडल्यानंतर आठ यंत्र व डंपरच्या सहाय्याने खडक हटवून दोन लेन वाहतुकीसाठी सुरु करण्यात आल्या.

तसेच याच बाजूचा उर्वरित खडक मंगळवारी फोडण्यात येणार असून दसऱ्याच्या दिवशी मुंबइहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पाच लेन सुरु करण्याचा प्रयत्न आहे. तर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बाजूचा खडक फोडण्याचे काम गुरुवारी किंवा शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे.

पूर्वी या पुलाच्या ठिकाणी एका बाजूने दोनच लेन उपलब्ध व्हायच्या. पूल पडल्यानंतर एक लेन मिळाली. तसेच पुलालगतचे खडक फोडल्यानंतर आणखी दोन लेन वाढणार आहेत. यामुळे आता एकूण पाच लेन तयार होणार असल्याने येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.