बेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. घाईत असलेले विद्यार्थी, नोकरदारांनी कोंडीची सकाळ अनुभवली.

तळेगाव-चाकण रस्त्यावरील टपाल कार्यालयासमोरील जुना रेल्वे पूल वाहतुकीसाठीसाठी बंद असल्याने एकाच चिंचोळ्या पुलावर रहदारी एकत्र होते. सकाळी सात ते नऊदरम्यान दूधवाले याच चौकात थांबतात. भर वस्तीतील एचपी गॅस गोडाउनच्या गाड्या निम्म्या रस्ता व्यापतात.

कंपन्यांचे बेशिस्त बसचालक भर रस्त्यावरच बस अचानक थांबून कामगारांची चढ-उतार करतात. त्यातच जनरल हॉस्पिटल गेटमधून उलट्या दिशेने येणारी वाहने येथील नित्याच्याच वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत.

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे बेशिस्त चालकांमुळे कोंडीला सुरवात झाली. नेमके याच वेळी वाहतूक नियमनासाठी पोलिस अथवा वॉर्डन जागेवर नसल्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली. विद्यार्थी, पालक, कामगार, चाकरमान्यांची वाहने कोंडीत अडकल्याने सर्वांना कार्यस्थळी पोचण्यास उशीर झाला. कोंडीतून सुटका करण्यासाठी उलट्या दिशेने घुसलेले बेशिस्त चालक आणि सरळ चाललेले चालक यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, चौकातील मिनीडोअर चालकांनी सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक नियमनाचे काम केल्याने कोंडी हळूहळू सुटली.

कोंडीबाबत माहिती कळविल्यानंतर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक सुरेश हगवणे यांनी वाहतूक सहायक पाठवून साडेनऊपर्यंत वाहतूक सुरळीत केली. सकाळी साडेसातपासून स्टेशन चौकात वाहतूक सहायक तैनात करण्याचे आश्‍वासन वाहतूक शाखेचे निरीक्षक सतीश पवार यांनी दिले.

‘जनरल हॉस्पिटल गेट बंद करा’ 
जनरल हॉस्पिटल गेटमधून उलट्या दिशेने येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांमुळे रहदारीस अडथळा होऊन टपाल कार्यालयासमोर रोजच कोंडी होते. जनरल हॉस्पिटल व्यवस्थापनाने द्वारपाल नेमून चाकण रस्त्यावरील गेट रुग्णवाहिकांचा अपवाद वगळता इतर चारचाकी वाहनांसाठी बंद करण्याची नागरिकांची खूप दिवसांची मागणी आहे. बंदी असूनही भर वस्तीत कार्यरत असलेल्या एचपी गॅस गोडाउनच्या सिलिंडर वितरणाची वाहने कोंडीला कारणीभूत ठरत असल्याने वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic in Talegaon Station