

फोटो ओळ
शिरजगावकसबा (जि. अमरावती) : ‘ट्रँक्विलायझर गन’ने बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकलेली वाघीण.
(फोटो क्रमांक ःAVT26A06915)
नरभक्षक वाघिणीचा मृत्यू
दोघांच्या मृत्यूस कारणीभूत; नागपूरला नेताना घटना
सकाळ वृत्तसेवा
शिरजगावकसबा (जि. अमरावती), ता. ७ : सोनोरी (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथे रविवारी एका युवतीला तर सोमवारी शिरजगावकसबा येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला ठार करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला वन विभागाने सायंकाळी ‘ट्रँक्विलायझर गन’चा वापर करून जेरबंद केले. मात्र, त्यानंतर उपचारासाठी नागपूरला हलविताना या वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती उपवनसंरक्षक अर्जुन के. आर. यांनी दिली.
या वाघिणीने उर्मिला इवणे (वय २२, सोनोरी शिवार,ता.चांदूरबाजार) या तरुणीवर रविवारी हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर देऊरवाडा गावात सोमवारी (ता. ७) सकाळी पहाटेच्या सोमतीर्थ भागातील जनावराच्या गोठ्यातील गाईला ठार केले, दुसऱ्या गाईला जखमी केले होते. त्यानंतर वाघिणीने मार्कंडा जंगलातून शिरजगावकसबा व कालाटोला जंगलात प्रवेश केला. सोमवारी (ता. ७) दुपारी शेतात काम करीत असलेल्या दिनेश शंकरराव आवारे (वय ५२, केनीपुरा, शिरजगावकसबा) या शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केले. २७ ऑगस्ट २०२६ रोजी भांबोरा (ता. मोर्शी) या गावात एका व्यक्तीवर वन्य प्राण्याने हल्ला करून ठार केले होते. हा हल्लासुद्धा बिबट्या किंवा वाघाने केल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.
सोमवारी वन विभागाच्या चंद्रपूर, नागपूर, पुणे, अमरावती या संयुक्त पथकाने वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले. ती बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच पिंजऱ्यात टाकून घटनास्थळावरून हलविले. वाघीण बेशुद्ध झाल्याची खात्री पटल्यानंतर तिला पिंजऱ्यात टाकून घटनास्थळावरून उपचारार्थ नागपूरला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
------
‘‘वाघिणीला बंदिस्त केल्यानंतर मोर्शी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर ‘सलाईन’ लावून तिला नागपूरला पाठविले. नागपूर येथे तपासणी केली असता वाघीण मृतावस्थेत आढळली. तिला जेरबंद करण्याच्या प्रक्रियेत तिच्यावर तणाव आल्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.’’
- अर्जुन के. आर.
उपवनसंरक्षक, अमरावती
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.