बारामतीत व्यवहार सुरू होणार, पण या आहेत अटी... 

मिलिंद संगई
Sunday, 10 May 2020

लॉकडाउनच्या 50 दिवसांनंतर बारामतीकरांना सोमवारपासून (ता. 11) काहीसा दिलासा मिळणार आहे.

बारामती (पुणे) : लॉकडाउनच्या 50 दिवसांनंतर बारामतीकरांना सोमवारपासून (ता. 11) काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसात बारामतीच्या परिस्थितीत झालेली लक्षणीय प्रगती विचारात घेता प्रशासकीय स्तरावर काहीसा दिलासा देण्याचा निर्णय रविवारी झाला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दुकानांना आठवड्यातून दोन दिवस सुरू ठेवण्याची परवानगी दिली. याबाबतचा आदेश उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज प्रसिद्ध केला. 

उपविभागीय अधिकारी कांबळे, मुख्याधिकारी योगेश कडूसकर व उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात दुकानांना आठवड्यातून दोन दिवस सुरू ठेवण्याची परवानगी दिली. अर्थात यातही नियम व अटींचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या प्रसंगी नरेंद्र गुजराथी, जगदीश पंजाबी, सदाशिव सातव, सुभाष सोमाणी, स्वप्नील मुथा, शैलेश साळुंके, रमणिक मोता आदी उपस्थित होते. 

कर्नाटकात जाणारे म्हणाले, महाराष्ट्रात परत आलो तर...

या निर्णयानुसार आठवड्यातील रविवार वगळून दोन दिवस सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार आहे. तसेच, जीवनावश्‍यक सेवेअंतर्गत असलेली किराणामाल दुकाने, भाजीपाला, फळे, दूध, शेतीविषयक बी बियाणे व औषधे यांची दुकाने रविवार वगळून दररोज उघडी ठेवण्यास परवानगी आहे. अर्थात ही दुकाने सुरू करताना काही बंधने पाळावी लागणार आहेत. यात ग्राहकांनी मास्क वापरणे, ग्राहक व दुकानदार यांनी सॅनेटायझर वापरणे, सर्वांनी शारीरिक अंतर पाळायचे, इन्फ्रारेड थर्मामीटरचा वापर करणे, प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क व ग्लोव्हज वापरणे, दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक लिहून घेणेही अनिवार्य करण्यात आले आहे. हॉटेल, लॉज, हेअर कटिंग सलून यांच्यासह रिक्षा वाहतुकीसही परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा   

बारामतीतील व्यवहाराचे वेळापत्रक 
सोमवार व गुरुवार ः ऑटोमोबॉईल (फक्त सर्व्हिसिंग करिता), कॉम्प्युटर व इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकाने, बॅटरी, रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉपी, फोटो स्टुडिओ, स्वीट होम्स, खेळणी दुकाने, फुले व पुष्पहार दुकाने. 
मंगळवार व शुक्रवार ः कापड दुकाने, भांडी, टेलरिंग, फूटवेअर दुकाने, रस्सी, पत्रावळी, ज्वेलरी व सोने दुकाने, वॉच स्टोअर्स, सुटकेस व बॅग. 
बुधवार व शनिवार ः जनरल स्टोअर्स, कटलरी, सायकल स्टोअर्स, टायर्स व पंक्‍चरची दुकाने, स्टील ट्रेडर्स, स्क्रॅप मर्चंट, हार्डवेअर्स, बिल्डिंग मटेरिअल, पेंट, कार वॉशिंग, झेरॉक्‍स, डिजिटल फ्लेक्‍स प्रिंटिंग, मातीची भांडी दुकाने, टोपल्या बांबू आदी. 

 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transactions will start in Baramati, but here are the conditions