Pune News : नवीन धोरणानुसार राज्यातील दहा हजार शिक्षकांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Transfer of ten thousand teachers in state as per new policy pune

Pune News : नवीन धोरणानुसार राज्यातील दहा हजार शिक्षकांच्या बदल्या

पुणे : नवीन बदली धोरणानुसार राज्यातील संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील मिळून एकूण दहा हजार ९० शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. नवीन बदली धोरणानुसार झालेली ही पहिलीच बदली प्रक्रिया आहे.

एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एकमधील सहा हजार ६९० आणि संवर्ग दोनमधील तीन हजार ४०० शिक्षकांचा समावेश आहे. राज्यातील एकूण बदल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील ५९९ शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, आणखी तीन आणि चार या दोन संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या बाकी आहेत.

या बदल्यांमुळे तीन वर्षाच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. यापैकी पहिल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द केल्याने तर, त्यानंतरचे दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविता आली नव्हती.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील ६४१ शिक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एकमधील ३८८ तर, संवर्ग दोनमधील २५३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

नव्या धोरणानुसार एकाच शाळेवर किमान पाच वर्षे केलेल्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेत सामावून घेण्यात आले. तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण २७ फेब्रुवारी २०१७ ला आणले होते.

या धोरणानुसार राज्यस्तरावरून आॅनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निर्णयाला शेकडो शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु सरकारने त्यात बदल केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. नवीन महाविकास आघाडी सरकारने शिक्षक बदल्यांचे जुने धोरण बदलून शिक्षकांसाठी फायदेशीर ठरणारे, नवीन धोरण अमलात आणले होते.

यासाठी पुणे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती ४ फेब्रुवारी २०२० ला स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींनुसार हे नवीन बदली धोरण अस्तित्वात आले आहे. सर्वाधिक बदल्या झालेले जिल्हे पुणे, नगर, यवतमाळ, नाशिक, सातारा, औरंगाबाद, बीड.

टॅग्स :Pune NewsteacherTransfers