काटेवाडीत बिबट्यावर ट्रॅप कॅमेऱ्यांची "नजर'

राजकुमार थोरात : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

बारामती तालुक्‍यात बिबट्याचा अधिवास नसल्याने काटेवाडी व कण्हेरी परिसरात पिंजऱ्याऐवजी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. ग्रामस्थांनी गाफील न राहता सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

वालचंदनगर (पुणे) : बारामती तालुक्‍यात बिबट्याचा अधिवास नसल्याने काटेवाडी व कण्हेरी परिसरात पिंजऱ्याऐवजी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. ग्रामस्थांनी गाफील न राहता सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

रुई परिसरात 10 डिसेंबर 2019 रोजी बिबट्या आल्याची पहिली बातमी आली होती. काटेवाडी-कण्हेरी परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या आला असण्याची शक्‍यता आहे. सोमवारी (ता.20) सायंकाळी चारीलगत चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी तो हल्ला परतवून लावला.

वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी काटेवाडी व कण्हेरी परिसरास भेट दिली. या संदर्भात वन परिमंडलाधिकारी त्र्यंबक जराड व अमोल पाचपुते यांनी सांगितले की, परिसरात बिबट्याचा अधिवास नसल्याने पिंजरा लावला नाही. बिबट्याच्या शोधासाठी काटेवाडी व कण्हेरी परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. सोमवारी रात्री कॅमेऱ्यात बिबट्या ट्रॅप झाला नाही. मात्र, ग्रामस्थांनी योग्य काळजी घ्यावी.

बिबट्याशी संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाच्या सूचना

* नागरिकांनी प्रवासादरम्यान मोबाईल, रेडिओवर गाणी वाजवणे, मनुष्याची चाहूल लागताच बिबट्या मार्ग बदलतो.
* घराबाहेर, अंगणात, उघड्यावर झोपू नये. उघड्यावर शौचालयास जाऊ नये.
* घरापासून ऊस क्षेत्राचे अंतर 25 फुटांपेक्षा जास्त असावे.
* बिबट्या कमी उंचीच्या भक्ष्यावर तातडीने हल्ला करतो, त्यामुळे लहान मुलांची काळजी घ्यावी.
* शक्‍य असल्यास घरासमोर अंगणाला जाळीचे कुंपण करावे.
* पाळीव जनावरांसाठी बंदिस्त गोठा करावा.
* घराजवळची झुडपे काढावीत.
* विद्यार्थ्यांनी शाळेत समूहाने ये-जा करावे.
* बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trap cameras 'eye' on leopard in katewadi