
Pune News : शिवसृष्टीत साकारणार राजसभा अन पुरंदरचा तह; अर्थसंकल्पात ५० कोटीची तरतूद
पुणे : आंबेगाव येथे साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शिवसृष्टीमध्ये ४० हजार चौरस फुटावर पुरंदरच्या तह, आग्र्याची कैद हा प्रसंग, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची राजसभेचा हुबेहुब देखावा साकारला जाणार आहे.
आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवसृष्टी उभारली जात आहे. याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आता प्रतिष्ठानतर्फे दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
२०२३-२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने य महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यामध्ये आंबेगाव येथील शिवाजी महाराज संकल्पना उद्यान यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर म्हणाले, ‘‘राज्य सरकारने शिवसृष्टीच्या कामासाठी तरतूद उपलब्ध करून दिल्याने दुसऱ्या टप्प्याचे काम करणे शक्य होणार आहे, त्याबद्दल सरकारचे आभार.
दुसरा टप्पा ३५० व्या राज्यभिषकेदिनाच्या महिन्यात म्हणजे जून २०२४ पर्यंत पूर्ण करून त्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
अनुभवता येणार शिवकाळ
१७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांची राजसभा कशी होती, कारभार कसा चालत होता याचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. तसेच ४० हजार चौरस फूट जागेवर पुरंदरचा तह, त्यानंतर आग्र्यामध्ये औरंगजेबाची भेट, शिवाजी महाराज यांना झालेली कैद, वेशांतर करून तेथून करून घेतलेली सुटका आणि राजगडावर मां जिजाऊ यांची झालेली भेट हा देखावा साकारला जाणार आहे.
नागरिकांनी ट्रॉलीमध्ये बसून फिरत हा देखावा पाहता येणार आहे. त्यावेळी हे दोन्ही देखावे इतके आकर्षक असणार आहे की जून काय आपण शिवकाळात आलो आहोत याची अनुभूती नागरिकांना येणार आहे. हा दुसरा टप्पा बघण्यासाठी नागरिकांना किमान दोन तासाचा कालावधी लागणार आहे, असे कुबेर यांनी सांगितले.