#Trendycloth लग्नासाठी राहा ट्रेंडी अन्‌ तेही कमी पैशांत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

प्रत्येक कार्यक्रमाला लोकांना नवीन तसेच ट्रेंडिंग कपडे हवे असतात. नेहमीच महागातले कपडे घेणे परवडत नाही म्हणून एखाद्या इव्हेंटसाठी अनेक जण भाड्याने कपडे घेणे पसंत करतात.
- तेजस गड्डा, विक्रेते

पुणे - स्वतःच्या लग्नात डिझायनर ब्राईडल लेहंगा घालण्याची इच्छा आहे, एम्ब्रॉयडरी असलेला नवाबी घालण्याची इच्छा आहे, पण तो घेऊ शकत नाही. कारण हजारो-लाखो रुपये किमतीचा टॅग? पण, आता त्याची चिंता सोडून द्या. कारण, लग्नासह विविध कार्यक्रमांसाठी कपडे भाड्याने घेण्याचा ट्रेंड वाढत असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

लग्नासाठी महागडे अन्‌ त्याहीपेक्षा स्वत:च्या आवडीचे आणि स्वत:ला शोभतील असे कपडे, त्याला आवश्‍यक असणाऱ्या ॲक्‍सेसरीज परिधान करणे आता आवाक्‍यात आले आहे. खास लग्नासाठी कपडे भाड्याने देण्यासाठी अनेक दुकाने शहरात आहेत. त्यामुळे लग्न किंवा इतर सोहळा ‘ग्रॅंड’ होण्यास मदत होत आहे. पूर्वी फक्त शाळेचे स्नेहसंमेलन किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी कपडे भाड्याने विकत घेण्याचा ट्रेंड होता; परंतु आता छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे डिझायनर कपडे अगदी कमी किमतीमध्ये भाड्याने मिळतात.

बॉलिवूडमधील सेलिब्रेटींची आलिशान लग्न तसेच दररोज दिसणाऱ्या मालिकांचा वाढता प्रभाव, यामुळे थीम बेस्ड लग्न-समारंभ करण्याकडे अनेकांचा कल असतो. यात महागडे कपडे घेणे प्रत्येकाला शक्‍य होतेच असे नाही. म्हणून लोक एका दिवसासाठी कपडे भाड्याने घेतात. पुण्यात हा ‘ट्रेंड’ वाढत असल्याचे विक्रेत्या प्रज्ञा राऊत म्हणाल्या.

कोणत्या कपड्यांना डिमांड?
लग्न समारंभ, प्रीवेडिंग शूट, संगीत, पार्टी, वाढदिवस, ऑफिस किंवा व्यावसायिकांचा औपचारिक-अनौपचारिक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला साजेसे कपडे उपलब्ध होतात. यामध्ये शेरवानी, नवाबी, ब्लेझर, जोधपुरी, पठाणी, लेहंगा, डिझायनर साडी, इंडो वेस्टर्न सूट, टक्‍सीडो, नऊवारी साडी, कच्छीकाम, मिरर वर्क, गोंडा वर्क, इंडोवस्टर्न घागरा, डबल लेअर घागरा या कपड्यांना मागणी असते. याचबरोबर स्नेहसंमेलन, नाटक व एकांकिकांसाठी ऐतिहासिक, पौराणिक कपड्यांना मागणी करतात. या कपड्यांचा दर एका दिवसासाठी ४०० रुपयांपासून आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत असतो.

माझ्या साखरपुड्यासाठी मी रेंटवर ड्रेस घेतला आहे. ४० हजारांचा ड्रेस रेंटवर चार हजाराला मिळत असेल तर एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी मला चार हजार खर्च करणे योग्य वाटते.
- प्रतीक्षा सातव, ग्राहक

लग्नसोहळ्यासाठी कितीही पैसे असले तरी कमीच पडतात. त्यात लग्नामध्ये एवढे महागाचे घेतलेले कपडे अनेक जण परत घालत नाहीत. म्हणून मी माझ्या लग्नात शेरवानी आणि ॲक्‍सेसरीज रेंटवर घेतली.
- राहुल गायकवाड, ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trendy cloth marriage money