
आदिवासी PHD संशोधक विद्यार्थ्यांचे दुसऱ्यांदा बेमुदत धरणे आंदोलन
विश्रांतवाडी: महाराष्ट्र राज्यामध्ये बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थेच्या धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) पुणे संस्थेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या (ST) पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती (Fellowship) सुरू करावी अशी मागणी मागील एका वर्षापासून विविध संशोधक विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करीत आहोत. याचाच एक भाग म्हणून दि. २८ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, (TRTI) पुणे. येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. दि. ०१ एप्रिल २०२२ रोजी मा. के. सी. पाडवी, मंत्री, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेटी दरम्यान आदिवासी संशोधक पीएच.डी अधिछात्रवृत्तीच्या शासन निर्णयाकरिता लागणारा प्रशासकीय प्रक्रियेचा कालावधी, वित्त विभागाच्या प्रक्रियेचा कालावधी, एका महिन्याचा लागू शकतो. त्यामुळे काही वेळ आदिवासी विभागास मिळावा अशी अपेक्षा विद्यार्थी कृती समिती समोर व्यक्त केली व आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली होती.
दि. ०४ एप्रिल २०२२ रोजी आयुक्तांच्या दालनामध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यासमवेत झालेल्या चर्चेला अनुसरून आणि मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाला अनुसरून दि. ०४ एप्रिल २०२२ रोजी आंदोलन स्थगित करण्यात आले होते; पण संबंधित एका महिन्यामध्ये कोणताही सकारात्मक निर्णय घेऊन अधिछात्रवृत्तीची जाहिरात दि. ३० एप्रिल २०२२ पर्यंत प्रसिद्ध न केल्यास दि. ०१ मे २०२२ पासून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. या एका महिन्यामध्ये कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे दि. ०२ मे २०२२ पासून आदिवासी पीएच.डी. संशोधक विद्यार्थी दुसऱ्यांना बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत.
आजही आदिवासी समाज दऱ्या डोंगरांमध्ये विखुरलेला असून उच्च शिक्षणापासून कोसो दूर असतानासुद्धा आदिवासी समाजातील संशोधक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून तात्काळ फेलोशिप लागू करावी अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित केला जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही स्वरूपामध्ये आंदोलन मागे घेतले जाणार नाही या भूमिकेवर संशोधक विद्यार्थी ठाम आहेत.
Web Title: Tribal Phd Research Students Indefinite Detention
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..