मुळशी सत्याग्रहाला युवकांकडून अनोखी मानवंदना  

mulshi
mulshi

माले (पुणे) : ब्रिटिशकालीन मुळशी धरणाच्या कामाविरोधात उभारलेल्या मुळशी सत्याग्रह आंदोलनाचे यंदा शंभरावे वर्ष आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांचे देशातील ते पहिले आंदोलन आहे. मुळशी तालुक्‍यातील 52 गावांतील शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाला मानवंदना देण्यासाठी वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या आठ युवकांनी संपूर्ण मुळशी धरणाला चालत प्रदक्षिणा घातली. दोन दिवसांत 86 किलोमीटर अंतर चालत त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. 

अतिपावसाच्या मुळशी पट्ट्यातील मुळा आणि निळा या नद्यांच्या संगमावर मुळशी येथे टाटा कंपनीने धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाधित होणाऱ्या 52 गावांतील शेतकरी पेटून उठले. विनायकराव भुस्कुटे व सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखालील मुळशी सत्याग्रह अजरामर झाला. या घटनेचे यंदा शंभरावे वर्ष आहे. त्यानिमित्त सत्याग्रहींना मानवंदना म्हणून वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या अनिल पवार, महेश मालुसरे, राजेश सातपुते, मारुती गोळे, दिग्विजय जेधे, मंदार मते, हरीश गवई आणि सदानंद नाईक या युवकांनी धरणाला पायी प्रदक्षिणा घालण्याचे ठरवले.

सेनापती बापट स्मारकावर सत्याग्रहींना अभिवादन करून या परिक्रमेला सुरुवात झाली. या परिक्रमेसाठी या युवकांनी धरणाच्या पाण्याच्या कडेने मुळशी येथून सुरवात केली. पहिल्या दिवशी गोणवडी, पळसे, ढोकळवाडी, वारक, चाचीवली, ताम्हिणी, सारोळे, निवे, शिरगाव, वडगाव, वाघवाडी, भादसखोंडा (कैलासगड पायथा), वडुस्ते, वांद्रे, अहिरवाडी, सुसाळे, भांबर्डे या गावांच्या हद्दीतून प्रवास झाला. दुसऱ्या दिवशी आडगाव बार्पे, तस्करी, माझगाव, सालतर, आंबवणे, कुंभेरी, पोमगाव, शिरवली, चांदिवली, शेडाणी, वडवाथर, नांदीवली, नाणिवली, वळणे व माले येथे शेवट झाला. सुमारे 86 किलोमीटर परिक्रमा झाली. धरणग्रस्त व सत्याग्रहींच्या त्यागास मानवंदना पूर्ण झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान, उत्साह होता. 

संबधित परिक्रमा सोपी नव्हती. कारण, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसदेखील होऊन गेला होता. आकाशात काळे ढग दाटायचे. कुठे भात खाचरांतून तर कुठे धरणातील चिखल तुडवत मोठमोठ्या दगडधोंड्यांतून मार्ग काढत चालणे सुरू होते. पाण्याजवळून आणि काही ठिकाणी धरणाच्या बाजूने परिक्रमा चालली. त्यांना या प्रवासात अनेक ठिकाणी धरात जलसमाधी नशिबी आलेली घर, देवालयांचे अवशेष दिसले. या धरणामुळे हजारो लोक विस्थापित झाले. मातीशी नाळ ठेवत अनेक जण आजही वडिलोपार्जित जमिनींवर छोटी घरं बांधून राहत आहेत. वाटेत भेटणारे धरणग्रस्त त्यांचे दुःख सांगत होते. 

मुळशी सत्याग्रहाचा हा लढा या परिसरातील लढाऊ वृत्तीचे प्रतीक असून, नवीन पिढ्यांसाठी प्रेरणा आहे. परिक्रमा आम्हाला कायमच समाजकार्य करत राहण्याची प्रेरणा देत राहील. कारण, ही परिक्रमा केवळ बाहेरची नव्हती, तो तर एक आंतरिक प्रवासच होता. आपल्याच मातीतील शेतकऱ्यांचा स्मरण करण्याचा. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेत नव्याने कार्यासाठी सज्ज होण्याचा आहे. 
 - अनिल पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com