

इराणकडून संभाव्य धोक्यामुळे
ट्रम्प यांचा गोपनीय प्रवास
अधिकृत विमानात बसल्याचे भासवून लष्करी विमानाने प्रवास
वॉशिंग्टन, ता. ११ (वृत्तसंस्था) : इराणकडून असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीयेमधील नाटो शिखर परिषदेनंतर मायदेशी परतताना एका गोपनीयरीत्या प्रवास केल्याचे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले आहे. ट्रम्प हे ‘एअर फोर्स वन’ या अधिकृत विमानात असल्याचे भासवले जात असताना, त्यांनी प्रत्यक्षात दुसऱ्याच लष्करी विमानाने प्रवास केल्याचे समोर आले आहे.
इराणकडून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही खबरदारी घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान, सोबत असलेले पत्रकार आणि ‘व्हाईट हाऊस’च्या काही कर्मचाऱ्यांनाही ट्रम्प आपल्यासोबतच विमानात असल्याचे वाटले. मात्र, ट्रम्प यांनी अत्यंत गोपनीयरीत्या विमान बदलले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प तुर्कीयेला जाताना कतारने भेट म्हणून दिलेल्या लाल, पांढऱ्या आणि गडद निळ्या रंगाच्या नवीन विमानाने गेले होते. मात्र, परतताना त्यांनी जुन्या ‘एअर फोर्स वन’ विमानाने प्रवास करणार असल्याचे जाहीर केले. हे नवीन विमान ब्रिटनमधील अमेरिकन सैनिकांना पाहण्यासाठी आधीच रवाना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. अंकारा येथे ट्रम्प कॅमेऱ्यासमोर जुन्या विमानात चढले, परंतु काही वेळातच त्यांना एका केटरिंग ट्रकच्या साहाय्याने गोपनीयरीत्या ‘सी-३२ ए’ या लहान विमानात हलवण्यात आले.
‘व्हाईट हाऊस’चे संपर्क संचालक स्टीव्हन च्युंग यांनी या वृत्तावर थेट भाष्य करणे टाळले असले, तरी अमेरिकेच्या शत्रूंपासून अध्यक्षांच्या संरक्षणासाठी सर्व यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकन ‘सिक्रेट सर्व्हिस’ने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या मोहिमेबाबत माजी सिक्रेट सर्व्हिस एजंट पॉल एकलोफ यांनी सांगितले, की अशा प्रकारची पावले दुर्मिळ असली तरी, प्रदेशातील अस्थिरता आणि गुप्तचर माहितीच्या आधारे ही खबरदारी घेतली असावी. दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेट सदस्य रिचर्ड ब्लुमेंटल यांनी या घटनेची संसदीय चौकशी करण्याची मागणी केली असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. वॉशिंग्टनला पोहोचण्यापूर्वी ट्रम्प यांना इराणच्या धमकीबाबत विचारले असता, आपल्याला सतत धमक्या येत असल्याचे सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.