पुणे - अभय फिरोदिया - पुण्यभूषण पुरस्कार प्रदान

पुणे - अभय फिरोदिया - पुण्यभूषण पुरस्कार प्रदान
Published on

व्यवसायात विश्‍वासार्हता, नैतिकता महत्त्वाची
----
केंद्रीय मंत्री गडकरी ः डॉ. अभय फिरोदिया यांचा पुण्यभूषण पुरस्काराने सन्मान
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः ‘‘उद्योग-व्यवसायात यश मिळविण्यासाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि संसाधने महत्त्वाची आहेतच. मात्र, २१व्या शतकात विश्‍वासार्हता, पत आणि नैतिकता हे सर्व अभय फिरोदियांमध्ये आहे. यामुळे ते सामाजिक जाणिवेतून समाजासाठी काम करत आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता. ९) काढले.
पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ३८ वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ गडकरी यांच्या हस्ते ‘फोर्स मोटर्स लि.’चे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, उपमहापौर परशुराम वाडेकर, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, उद्योजक गजेंद्र पवार आदी उपस्थित होते.  
गडकरी म्हणाले, ‘‘आपला देश २०१४ मध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात जगात सातव्या क्रमांकावर होता. आज आपण जपानला मागे टाकून २२ लाख कोटी रुपयांच्या उलाढालीसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. देशात सर्वाधिक म्हणजे साडेचार कोटी युवकांना रोजगार आणि सरकारला सर्वाधिक जीएसटी देणारे हे क्षेत्र आहे. आत्मनिर्भर भारत घडवण्यात या उद्योगाचा मोठा वाटा आहे.’’

शिंदे म्हणाले, ‘‘अभय फिरोदिया हे केवळ पुण्याचे भूषण नसून ते देशाचे भूषण आहेत. फिरोदिया यांचे योगदान केवळ वाहन उद्योग क्षेत्रापुरते मर्यादित नाही. त्यांचे कार्य ‘शिक्षण, उद्योग आणि नैतिकता’ या सूत्रावर आधारलेले आहे. त्यांच्या कुटुंबाला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा लाभला असून सामाजिक न्यायाची बीजे त्यांच्यात रुजलेली आहेत.’’

फिरोदिया म्हणाले, ‘‘जैन परंपरेची मूल्य सांभाळत माझी जडणघडण झाली. यामध्ये शस्‍त्र, संवाद, कृषी, वाणिज्य, कला, विद्या आणि संपत्ती यांचा समावेश आहे. मी नैतिकमुल्यांना धरूनच उद्योग व्यवसाय मोठा केला. उद्योग करताना पुस्तकी विद्या महत्त्वाची नसून, व्यावहारिक ज्ञान सुद्धा महत्त्वाचे असते. तसेच उद्योग व्यवसायातून आर्थिक सक्षम होत असताना, आपण समाजामुळे सक्षम झालो आहोत याचे भान ठेऊन, समाजाला परत द्यायला विसरू नका. याच विचाराने मी विविध ट्रस्टच्या माध्यमातून समाजाचे देणे विविध प्रकारे परत करण्याचा मी प्रयत्न करत आहे.’’
या वेळी सीमेवर कर्तव्य बजावत असताना जायबंदी झालेल्या जवानांचा आणि वीरमाता लता भागवत यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. डॉ. समीरा गुजर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. काका धर्मावत यांनी आभार मानले.

फोटो ओळी -----
पुणे ः पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ३८ वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ‘फोर्स मोटर्स लि.’चे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी डावीकडून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सतीश देसाई, फिरोदिया दांपत्य, गडकरी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com