अरणगावात दोन एकर ऊस जळून खाक

अविनाश लोखंडे 
Thursday, 26 November 2020

आरणगाव येथील गट नंबर ९५ मधील राजेंद्र बापू टेमगिरे या शेतकऱ्याचा दोन दिवसापूर्वी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठाण (ता.दौंड) येथे ऊस तुटून गेला होता.

रांजणगाव सांडस (पुणे) : शिरूर तालुक्यातील अरणगाव येथे शेतकऱ्याच्या ऊस कारखान्याला पाचट जाळत असताना उभ्या ऊसामध्ये आग लागल्याने सुमारे दोन एकरातील ऊस जळाला आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईनचा वापर पोलिस पाटील संतोष लेंडे यांनी केल्याने सुमारे ४० ते ५० एकर ऊस खाक होता होता वाचल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याचे टळले.

आरणगाव येथील गट नंबर ९५ मधील राजेंद्र बापू टेमगिरे या शेतकऱ्याचा दोन दिवसापूर्वी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठाण (ता.दौंड) येथे ऊस तुटून गेला होता. सदर शेतकऱ्यांनी शेतातील पाचट जाळत असताना सदरची आग याच गटातील दादासाहेब लाळगे या शेतकऱ्याच्या ऊसाला बुधवारी लागली. ही घटना येथील पोलिस पाटील संतोष लेंडे यांना समजताच त्यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (१८००२७०३६००) नंबर वरून ही माहिती संपूर्ण गावातील ग्रामस्थांना एकाच वेळी कॉल करून सांगितली. त्यामुळे काही मिनिटातच १००-१५० लोक सदर शेतावर धावून आले. 

हे ही वाचा : निमगाव-म्हाळूंगीच्या १३ युवकांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

सर्वांच्या मदतीने शेजारील ऊस आगीपासून तोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जवळपास ४० ते ५० एकर ऊस आगीमधून खाक होण्याचा वाचला. तरीसुद्धा लाळगे यांचा दोन एकर क्षेत्रातील ऊस आगीमध्ये भस्मसात झाला आहे. सदर घटनेची तक्रार मुलगा योगेश दादासाहेब लाडगे यांनी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील पोलिस स्टेशनला दिली आहे. दरम्यान ऊस जळाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाख ५० हजार रुपये नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी व कारखान्याने ऊस तोड लवकर करावी, अशी मागणी शेतकरी दादासाहेब लाळगे यांनी केली आहे.              

ग्रामीण सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईनचा वापर केल्याने काही मिनिटातच अनेक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष शेतात धाव घेतली. त्यामुळे इतर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळले. 
-संतोष लेंडे -पोलीस पाटील, आरणगाव ता.शिरूर  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two acres of sugarcane has been burnt at Arangaon in Shirur taluka