"एचडीएफसी'च्या व्यवस्थापकासह दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

लाचेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एचडीएफसी बॅंकेकडून प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, कोणत्याही कर्मचाऱ्याकडून गैर व बेजबाबदार वर्तन घडल्यास बॅंकेकडून कारवाई करण्यात येईल.

पुणे - कर्जमंजुरीसाठी एकाकडून दोन लाखांची लाच घेणाऱ्या एचडीएफसी बॅंकेच्या बारामती शाखेतील व्यवस्थापकासह कर्मचाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (सीबीआय-एसीबी विंग) शुक्रवारी रंगेहात पकडले. 

नितीन निकम आणि गणेश धायगुडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. निकम हे रिलेशनशिप मॅनेजर तर धायगुडे हे बॅंकेत कर्मचारी आहेत. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनी लाच मागितल्याप्रकरणी एकाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराने एचडीएफसी बॅंकेच्या बारामती शाखेत 99 लाख रुपयांचे कर्जप्रकरण दाखल केले आहे. संबंधित कर्ज प्रकरण मंजूर व्हावे यासाठी तक्रारदाराकडून पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र कर्ज मंजूर करण्यासाठी निकम आणि धायगुडे यांनी तक्रारदाराकडे दोन लाख 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने सव्वा दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर या गैरकारभारविरुद्ध सीबीआयकडे तक्रार दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

तक्रारीची तपासणी करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने सापळा लावला. लाचेची रक्कम घेण्यासाठी निकम यांनी धायगुडे यांना पाठविले होते. तक्रारदाराकडून दोन लाखांची लाच स्विकारताना धायगुडे यांना पकडण्यात आले. लाच बाबत चौकशी करण्यात आल्यानंतर या प्रकरणात निकम यांचा देखील सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला देखील अटक करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोघांविरोधात बॅंकेकडूनही कारवाई होणार 
लाचेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एचडीएफसी बॅंकेकडून प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, कोणत्याही कर्मचाऱ्याकडून गैर व बेजबाबदार वर्तन घडल्यास बॅंकेकडून कारवाई करण्यात येईल. बारामती शाखेतील व्यवस्थापकासह दोघांविरोधात बॅंकेकडून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणात बॅंकेकडून पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested including HDFC manager