ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे उसाची ट्रॉली चोरणारे बहाद्दर जेरबंद

राजकुमार थोरात
Friday, 30 October 2020

पिलेवाडी (ता. इंदापूर) येथून उसाची ट्रॉली चोरुन नेणाऱ्या दोन चोरट्यांना ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या कॉलमुळे पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले

वालचंदनगर : पिलेवाडी (ता. इंदापूर) येथून उसाची ट्रॉली चोरुन नेणाऱ्या दोन चोरट्यांना ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या कॉलमुळे पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले.

दरम्यान, याप्रकरणी महेश उद्धव पवार (वय २१) व उत्कर्ष जवाहर माने (वय १९, रा. पिलेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचा - पाकच्या संसदेत मोदी नामाचा घोष

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता. २०) रोजी ट्रॅक्टरचालक बाळासाहेब कोपनवर हे १४ उसतोडणी कामगारासह पिलेवाडी गावाच्या हद्दीमध्ये भगवान जगताप यांच्या शेतामध्ये उसतोडणी करण्यासाठी आले होते. रात्रीच्या वेळी उसाची एक ट्रॉली भरुन घेवून जात असताना चिखलामध्ये ट्राॅली अडकल्याने भरलेली व रिकामी उसाची ट्रॉली जागेवरच ठेवून कोपनवर हे उसतोडणी कामगारांची कोपीवर ट्रॅक्टर घेवून गेले होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून महेश पवार व उत्कर्ष माने या दोघांनी रिकामी ट्रॉली चोरुन नेल्याची घटना घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी सचिन पोपट गोडसे (रा. थेरवडी ता. कर्जत जि. नगर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस कॉन्सटेबल नितीन कळसाईत यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या १८००२७०३६०० या टोल फ्री  क्रमांकावर फोन करुन चोरीची घटना व ट्रॉलीचे वर्णन कळविल्यामुळे वालचंदनगर व भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी,पोलिस पाटील, सरपंच व ग्रामसुरक्षा दलाच्या युवक व ग्रामस्थांना चोरीची घटना व ट्रॉलीचे वर्णन समजले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरुवार (ता. २९) रोजी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा कॉल ऐकणाऱ्या व्यक्तीने भिगवणमध्ये चोरीला गेलेली ट्रॉली उभी असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना दिल्यानंतर वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रमोद बनसोडे व पोलिस काॅन्स्टेबल नितीन कळसाईत यांनी तातडीने ट्रॉली ताब्यात घेतली. व ट्रॉली चोरणाऱ्या चोरट्यांची माहिती काढून सापळा रचून महेश पवार व उत्कर्ष माने यांना पिलेवाडीमधून अटक केले.

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested for stealing sugarcane trolley