Ashadhi Wari : आषाढी वारीत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two corona infected patients were found in Ashadhi Wari

Ashadhi Wari : आषाढी वारीत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

पुणे - आषाढीवारी पालखी सोहळ्यादरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासह कोरोना तपासणी आणि लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत १७३ बाह्यरुग्ण पथकांच्या माध्यमातून ७९ हजार ३६९ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. दरम्यान, पालखी सोहळ्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

पुणे ग्रामीण हद्दीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालख्यांचे मार्गक्रमण सुरू आहे. २८ जूनला रात्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम फलटण तालुक्यातील लोणंद आणि संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम बारामती येथे होता. आरोग्य विभागाने दोन्ही पालख्यांसाठी रुग्णवाहिका ओपीडी पथके, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांची रुग्णालय पथके, पालखीतळ आरोग्य पथके, आरोग्यदूत पथक, फिरती रुग्णवाहिका ओपीडी पथके अशी बाह्यरुग्ण उपचार पथके नेमण्यात आली आहेत. पालखी मार्गांवर ५५० वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

वारकऱ्यांसाठी आरोग्यदूत

यंदाच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये आरोग्य दूत पथके नेमण्यात आली आहेत. ते दुचाकी वाहनांवरून अडचणीच्या ठिकाणी, गर्दीमध्ये, वाहतूक कोंडीमध्ये सहजपणे पोहोचून पालखीदरम्यान आरोग्य सेवा उपलब्ध करुन देत आहेत. त्यांच्या दुचाकीवर औषधांचे किट॒स आणि ड्रेसिंग साहित्य दिले आहे. मार्गावरील टँकर, पाणी भरण्याची ठिकाणे, हॉटेलमधील पाण्याची तपासणी करण्याचे काम आरोग्य दूतामार्फत करण्यात येत आहे. वारकऱ्यांसाठी दिंडी प्रमुखांकडे औषध किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

दोन्ही पालख्यांमध्ये मिळून फ्लूसदृश्य व इतर लक्षणे असलेल्या ७८२ वारकऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, आतापर्यंत ९१६ भाविकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

सर्व अधिकारी आणि कर्मचारी सेवाभावनेने वारीसोबत आहेत. भाविकांना वारीचा आनंद घेता यावा, यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Two Corona Infected Patients Were Found In Ashadhi Wari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..