दोन अपघातांत वृद्धेसह तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे - चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत वृद्ध महिलेसह एका तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव बसने धडक दिल्याने वृद्ध महिलेला, तर भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

पुणे - चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत वृद्ध महिलेसह एका तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव बसने धडक दिल्याने वृद्ध महिलेला, तर भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

वेताळबाबा चौकात झालेल्या अपघातात 70 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. सुनील मनुराम चव्हाण (वय 30, रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, हडपसर) असे बसचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चतुःशृंगी येथून सिंबायोसिस कॉलेजच्या दिशेने चव्हाण बस भरधाव चालवत होता. बस वेताळबाबा चौकात आल्यानंतर झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेस बसची जोरदार धडक बसली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जोगदंड करत आहेत.

पाषाण येथे झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव दत्ता व्यंकटराव शिरसकर (वय 21, रा, साईनगर, सोमेश्‍वरवाडी पाषाण) आहे. शिरसकर हा 27 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्याच्या दुचाकीवरून भरधाव जात होता. कुमार शांतिनिकेतन सोसायटीच्या समोर आल्यानंतर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याकडेला थांबलेल्या कारला घासून पुढे गेली. शिरसकर हा दुचाकीसह खाली पडून ड्रेनेजलाइनच्या चेंबरवर जोरदार धडकला. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास चतुःशृंगी पोलिस उपनिरीक्षक ए. आर. शिंदे करत आहेत

मार्च महिन्यात दोन तरुणांचा मृत्यू
मार्च महिन्यामध्ये 30 तारखेला प्रतीक राजेश सिंग (वय 23, रा. भोपाळ) या तरुणाचा भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता, तर 22 मार्चला वारजे माळवाडी येथील डॉमिनोज पिझ्झासमोरील सुदर्शन रस्त्यावर श्‍यामसुंदर बहिर (वय 26) याचाही भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. दोन्ही अपघातांच्या चौकशीनंतर याप्रकरणी वारजे व चतुःशृंगी पोलिस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two death in accident