पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस; आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

शहरात मंगळवारी मध्यरात्री एक ते पहाटे चार या अवघ्या तीन तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह ६० मिलिमीटर पाऊस कोसळला. बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, संध्याकाळी सातला व पुन्हा नऊच्या दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. 

पुणे : शहरात मंगळवारी मध्यरात्री एक ते पहाटे चार या अवघ्या तीन तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह ६० मिलिमीटर पाऊस कोसळला. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, संध्याकाळी सातला व पुन्हा नऊच्या दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. 

पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात हलक्‍या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. कमाल तापमानाच्या पाऱ्याने तिशीपार केली होती. या दरम्यान, अरबी समुद्रामध्ये हिक्का चक्रीवादळ घोंगावत आहे. तसेच, बंगालच्या उपसागरातील आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग आणि तमिळनाडूच्या उत्तर भागात वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. या वातावरणाचा थेट परिणाम राज्यात होत आहे.

 पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात रविवारी आणि सोमवारी दिवसभर उन्हाचा कडाका वाढला होता. त्याच्या परिणामामुळे मंगळवारी पहाटेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

पुण्यात मंगळवारी (ता. २४) सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासांत ५५.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस रात्री एक ते पहाटे चार या दरम्यान पडला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करत तीन तास हा पाऊस कोसळत होता. आळंदी, कन्हेरसर, मावळ, बारामती, माळशिरस, पंढरपूर येथेही पावसाने हजेरी लावली.

कोल्हापूर, बार्शी, मोहोळ, नागपूर येथे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. विदर्भातील वडवनी, धर्माबाद, शिरूर अनंतपाल, वाशी, परांडा, देगलूर, निलंगा येथेही जोरदार पाऊस पडला; तर माजलगाव, शिरूरकासार, वसमत, अहमदपूर, रेणापूर, बिल्लोली, किनवट, मुखेड, गंगाखेड येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

चाकणला दुकानात शिरले पावसाचे पाणी
चाकण - चाकण व परिसरात सोमवारी मध्यरात्री तसेच मंगळवारी सायंकाळी सहा ते सव्वासातच्या सुमारास झालेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली. चाकण शहरात अनेक इमारतींच्या वाहनतळाच्या जागेत, तळमजल्यावर बांधलेल्या दुकानात पाणी शिरले. ते काढण्यासाठी विद्युत पंप लावावे लागले. दरम्यान, हा पाऊस काढणीस आलेल्या पिकांसाठी नुकसान करणारा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पावसाचा फटका मूग, वाल, भुईमूग, बाजरी पिकांना बसला आहे. 

देहू परिसरात मुसळधार पाऊस 
देहू - देहू आणि देहूरोड परिसरात मंगळवारी (ता. २४) पहाटेपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. रेल्वेस्थानकाजवळील बसस्थानकालगतच्या झाडावर वीज पडून झाड कोसळले; तर अनेक घरात पावसाचे पाणी शिरले. काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. 

मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरवात झाली. सुमारे चार तास पडलेल्या पावसाने ओढेनाले पाण्याने भरून वाहू लागले. देहूतील अनगडशावली दर्ग्याजवळील ओढ्याला पूर आला; तर झेंडेमळा येथील घराघरांत पाणी शिरले, अशी माहिती प्रदीप झेंडे या स्थानिकाने दिली.

मंगळवारी दुपारीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे देहूरोड बाजारपेठेतील ग्राहकांची तारांबळ उडाली. देहूतील प्रवेशद्वाराजवळ पावसाचे पाणी साचले.

‘हिक्का’ ओमानच्या दिशेने
अरबी समुद्राच्या उत्तरेला घोंगावत असलेले हिक्का चक्रीवादळ पश्‍चिम-नैऋत्य दिशेने सरकत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये ते ओमानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्‍यता आहे. सध्या हे चक्रीवादळ प्रतितास २० किलोमीटर या वेगाने पुढे सरकत आहे. जमिनीवर धडकत असताना या वादळाची तीव्रता कमी होईल. या चक्रीवादळामुळे ओमानच्या काही भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे वाहतील. जमिनीवर पोचल्यानंतर चोवीस तासांमध्ये ‘हिक्का’ येमेन, ओमान आणि सौदी अरेबियाकडे जाईल आणि या दोन राष्ट्रांमध्येही पाऊस पडेल, असे ‘स्कायमेट’ने नमूद केले आहे.

शिवछत्रपती क्रीडासंकुलाची  भिंत पडल्याने घरांमध्ये पाणी
औंध : शिवछत्रपती क्रीडा संकुलाची संरक्षक भिंत पाण्याच्या दाबाने पडून महाळुंगे (पाडाळे) येथील शितळादेवी नगरमधील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्याच्या कडेलाच असलेली ही संरक्षक भिंत पडून पाणी थेट उतारावरून घरात शिरल्याने अनेक जणांना घराबाहेर राहण्याची वेळ आली.

 या भिंतीसंदर्भात क्रीडा संकुल प्रशासनाकडे तक्रारी तसेच अनेक वेळा संभाव्य धोक्‍याची कल्पना देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे रहिवाशांनी सांगितले. या दुर्घटनेत स्थानिक रहिवासी सागर गायकवाड, काळूराम पाडाळे, काळूराम गायकवाड यांच्यासह अनेकांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी साचल्याने दैनंदिन वापरातील साहित्यासह इलेक्‍ट्रॉनिक साहित्य व धान्याचे नुकसान झाले आहे. स्थानिक रहिवासी मनोज नामदेव पाडाळे, ज्ञानेश्वर दगडू पाडाळे यांनी याबाबत तक्रार केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more days of rain in Pune