esakal | शिरूरमध्ये ऑक्सिजनचे दोन नवे प्रकल्प

बोलून बातमी शोधा

oxygen plant
शिरूरमध्ये ऑक्सिजनचे दोन नवे प्रकल्प
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा : पुरेशा ऑक्सिजन पुरवठ्याअभावी रुग्णांचे जीव संकटात असताना शिरूरमध्ये ऑक्सिजनचे दोन नवे प्रकल्प सुरु होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सणसवाडीच्या प्लॅंटमधून तातडीने ऑक्सिजन पुरवठा सुरू होणार आहे.

संपूर्ण देशभर ऑक्सिजनचा तुटवडा आहे. शिरूर-हवेलीत कोरोना रुग्णांची दररोज ३०० पेक्षाही जास्त ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे. ती पूर्ण कशी करायची, या विवंचनेत लोकप्रतिनिधी व प्रशासन होते. यावर तातडीचा पर्याय म्हणून सणसवाडी (ता. शिरूर) येथील चिन्मय ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड हा लिक्विड ऑक्सिजन सिलेंडरचा रिफिलिंग प्लँट तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ऑक्सी-एअर नॅचरल रिसोर्सेस हा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लँटला प्रशासनाच्या मदतीने तातडीने वीज जोडणी, तसेच इतर परवानग्या देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: नव्या स्ट्रेन विरुद्ध दोन्ही लशी कार्यक्षम; शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण

सणसवाडी (ता. शिरूर) येथील चिन्मय ऑक्सिजन या लिक्विड ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग करणारा प्लँट ऑक्सिजन टँकरचा पुरवठ्याअभावी बंद होता. त्यासाठी आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्त एस. बी. पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर आयुक्त एस. बी. पाटील यांनी या प्लँटला नव्याने परवानगी देत पाच टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे पुरवठा झाल्यास दुसऱ्या दिवशी या प्लँटमधून शिरूर - हवेलीतील ३२ रुग्णालयांना किमान २५० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा होवू शकणार आहे. तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ऑक्सी-एअर नॅचरल रिसोर्सेस हा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लॅंटही आठवडाभराच्या आतच सुरु होणार आहे. प्रति दिन सुमारे ८ मेट्रीक टन क्षमतेच्या या प्लँटमुळे शिरूर - हवेलीतील जवळपास सर्वच रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार आहे.

हेही वाचा: पुण्यात ऑक्सिजन प्लँटसाठी १३ कोटींचा निधी

''ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये, यासाठी सणसवाडी तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन प्लँटसाठी केलेल्या प्रशासकीय पाठपुराव्याला यश आले आहे. सणसवाडीच्या प्लँटमधून उद्यापर्यंत तर रांजणगाव वसाहतीच्या प्लँटमधून चार-पाच दिवसात उत्पादन प्रक्रिया सुरु होईल. जेणेकरून पुढे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल.''

-आमदार ॲड. अशोक पवार, शिरूर-हवेली.

''सध्या शिरूरमधील रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी दररोज वाढत असून पुरेशा पुरवठ्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सणसवाडी व रांजणगावचे प्लँट पूर्ण क्षमतेने चालल्यास नियमित पुरवठा होऊन कोणताही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावणार नाही.''

-संतोषकुमार देशमुख, प्रांताधिकारी, शिरूर