पुणे : हायवेसाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला चिमुकलीचा जीव; लेकीच्या आईने फोडला हंबरडा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या काळूबाई नगर परिसरात सध्या अष्टविनायक महामार्गाचं काम सुरू आहे. यामुळे रस्त्याकडेला एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता.

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील काळूबाईनगर परिसरात खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चोरट्याचा दिवाळी धमाका; लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेला पाच लाखाचा ऐवज पळविला​

शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या काळूबाई नगर परिसरात सध्या अष्टविनायक महामार्गाचं काम सुरू आहे. यामुळे रस्त्याकडेला एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात पाणी साचले होते. खेळत खेळत या खड्ड्याजवळ गेलेल्या श्रेया संतोष इचके (वय २) या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. बेल्हेकर इन्फ्रास्ट्रक्टर ही कंपनी रस्त्याचे काम करत आहे. त्यामुळे या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलीच्या आईने केली आहे.  

या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे, कॉन्स्टेबल संतोष पालवे पुढील तपास करत आहेत. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे चिमुकलीचा हकनाक बळी गेल्याने घटनास्थळी जमलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला होता. ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी शिरुर पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे आणि मारुती इचके यांनी केली.

केवढा हा राग; गाडी बाजूला घेतली नाही म्हणून दोघांवर तलवारीने वार!​

संबधित घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईक आणि उपस्थितांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. तेव्हा दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस निरीक्षक काबुगडे यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला. दुपारी तीन वाजता या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two year old little girl died due to falling into a pit in Shirur