चोरट्याचा दिवाळी धमाका; लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेला पाच लाखाचा ऐवज पळविला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या अर्धवट खुल्या असलेल्या खिडकीतुन आतमध्ये हात घालून जवळच असलेल्या मुख्य दरवाजाची आतील कडी उघडली.

पुणे : बहुतांश चोरटे चोरी करताना दरवाजा, खिडक्‍या तोडून-फोडून घरात जाऊन चोरी करतात, पण तो चोरटा भलताच हुशार होता. त्याने अर्धवट उघड्या खिडकीतून आतमध्ये हात घालून मुख्य दरवाजाची आतील कडी उघडली. तेव्हा घरातील हॉलमध्ये लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेले सोन्याचे दागिने, दोन मोबाईल, रोख रक्कम असा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरट्याला समोर दिसला, ते सर्व जमा करून चोरटा आलेल्या मार्गाने परत गेला!

डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियासोबत साजरी केली दिवाळी; व्हाईट हाऊस उजळले दिव्यांनी!​

येरवड्यातील जयजवान नगर परिसरातील गुरूद्वारा रोडवरील घरामध्ये रविवारी पहाटे पावणे चार वाजता ही घटना घडली. याप्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गुरूद्वारा रोड परिसरात राहतात. शनिवारी दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी त्यांनी घरातील दागिने, रोख रक्कम बाहेर काढली होती. रात्री पूजा झाल्यानंतर त्यांनी दागिने, रोख रक्कम आणि पूजा तशीच ठेवली. दरम्यान, रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या अर्धवट खुल्या असलेल्या खिडकीतून आतमध्ये हात घालून जवळच असलेल्या मुख्य दरवाजाची आतील कडी उघडली.

विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यास जबाबदार कोण? शाळा सुरू करण्यावरून उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया​

त्यानंतर मुख्य दरवाजातून आतमध्ये घुसलेल्या चोरट्यास समोरच लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेले दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज दिसला. त्याननंतर त्याने हा ऐवज घेऊन तेथून पळ काढला. फिर्यादी यांनी सकाळी उठून पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, चोरट्याने फिर्यादी यांच्या परिसरातच राहणाऱ्या हरिष चौधरी यांच्या कश्‍मिरी कॉलनीतील कृष्णा स्वीट मार्ट या दुकानाचे शटर उचकटून दुकानाच्या गल्ल्यातील रोख चोरुन नेली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर करपे करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief stole jewelery and cash worth Rs 5 lakh kept for Laxmi Pujan