

सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता.१७ ः ‘‘दिशा सालियानचा मृत्यू दुर्दैवी आहे, तिच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे; पण या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नाही, आम्ही तिला ओळखत नाही. आम्हाला बदनाम करण्यासाठी हे राजकीय कारस्थान रचले जात आहे. चारित्र्य हनन कराल तर कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला जाईल,’’ असा इशारा शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
येथे पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणाबाबत प्रथमच भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘आम्ही आतापर्यंत यावर कधीही बोललो नाही, आताही मला जास्त बोलायचे नाही. आदित्य ठाकरे काय किंवा आम्ही कोणीही दिशा सालियानला ओळखत नाही, आमची तिच्याशी कधी भेटही झाली नाही तरीदेखील आमची नावे घेतली जात आहेत. निश्चितपणे हा एका राजकीय कारस्थानाचा भाग आहे.’’ ‘शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने स्वतंत्र निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुका लढविण्याचा पर्याय का स्वीकारला नाही?’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला, तेव्हा शिंदेंच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी वेळ मागून घेतल्याचे पत्रकारांनी सांगितले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आमचा मुद्दा हाच आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गद्दारांची चोरी आता उघडी झाली. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, पक्ष आणि चिन्ह या लोकांनी चोरले. तुमचा निर्णय योग्य होता, तर मग तुम्ही स्वतंत्र चिन्ह घेऊन निवडणुका का लढल्या नाहीत? गद्दारांचा डाव त्यांच्यावरच उलटला,’’ असे ठाकरे म्हणाले.
मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य कायम
ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकारला मराठवाड्यातील नेतृत्व नको आहे, अशी टीका केली. ‘‘भाजप नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपची बीजे रोवली. मुंडे शपथ घेतल्यानंतर मंत्री म्हणून एक दिवसही सभागृहात जाऊ शकले नाहीत, हे शल्य मनात आहे. त्यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,’’ असेही ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.