

ढिंग टांग०६०८२६
काय हुईल? कस्सं हुईल..?
- ब्रिटिश नंदी
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान बुद्रुक. वेळ : अंतिम लढाईची.
राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंतःपुरात येरझारा घालत आहेत. मधूनच मोबाईल फोन उचलून मेसेज तपासत आहेत. वाट पाहून पाहून जीव थकला आहे. अब आयेगा ऊंट पहाड के नीचे, बघून घेईन! वगैरे उद्गार स्वतःशीच काढून हवेत तलवारीचे हात करत आहेत. अब आगे...
उधोजीराजे : (गर्रकन मान वळवून) कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (लगबगीने आत येऊन मुजरा करत) मुजरा महाराज! आपण याद केलीत? बंदा हाजीर है..!
उधोजीराजे : (मिशीवर ताव मारत) राज्याचा काय हालहवाल आहे?
संजयाजी फर्जंद : (कडवट चेहरा करत) अतिशय वाईट आहे महाराज! चोर चोऱ्या करत आहेत, दरोडेखोर दरोडे टाकत आहेत! गद्दार राजरोज उजळमाथ्याने हिंडत आहेत! महागाईनं शीग गाठली असून बेरोजगारीनं कळस गाठला आहे! सामान्य माणसाला कुणीही वाली उरला नाही! एकंदरीत भयंकर परिस्थिती आहे, महाराज!!
उधोजीराजे : (खुशीत) हय शाब्बास! चांगली खबर दिलीत!! मस्तवाल सत्ताधीशांची चांगली जिरली! आम्ही वेळेवर चार तुकडे फेकले म्हणून हे सत्ताधारी जगले, आता आमच्यावरच उलटले!! या निमकहरामांना आता मी नाक धरून खाली ओढतो की नाही बघा! हे सरकार गाडल्याशिवाय आता हा उधोजी गप्प बसणार नाही!! नाही म्हंजे नाही! किंबहुना नाहीच बसणार!!
संजयाजी फर्जंद : (नम्रपणाने) अलबत महाराज!! आता दुस्मानाची काही खैर नाही!!
उधोजीराजे : (डोळे बारीक करून) आपले शिलेदार कुठे आहेत? अजून हजेरीसाठी महालावर का आले नाहीत?
संजयाजी फर्जंद : (खुलासा करत) समदे दिल्लीला कोर्टात गेले आहेत, महाराज! गद्दारांची फायनल विल्हेवाट लावण्यासाठी समद्यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी केली आहे! म्या बी तिकडूनच आलो!!
उधोजीराजे : (आत्मविश्वासाने) गद्दारांची शंभरी भरली! आता काही दिवसातच त्यांना पुन्हा गुवाहाटीला जावं लागणार! माझ्या पाठीत खंजीर खुपसून या खोकेबाज गद्दारांनी त्या कमळाबाईच्या सांगण्यावरुन कटकारस्थानं रचली! अरे, पण हा उधोजी तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही!
संजयाजी फर्जंद : (दातात काडी सारत) थुथुक...तुम्ही काई करायची गरजच नाही, महाराज! कोर्टातच त्यांचा खेळ आटोपतोय!! बघालच तुम्ही!! आपल्या वकिलानं काल अस्सा काही युक्तिवाद केला की यंव रे यंव! कमळाबाईकडं धावत सुटतील आता ही बेणी!! बाई, वाचीव गं, आम्हाला वाचीव! आम्हाला तुझ्या पदरात घे! हाहा!!
उधोजीराजे : (हलकेच मुस्करत) फू:!! कमळीच काय, तेहेतीस कोटी देव आले तरी त्यांना आता कुणी वाचवू शकत नाही!! (कानोसा घेत) हां, थांबा! हा कसला आवाज आला?
संजयाजी फर्जंद : (थंडपणाने) शंकेची पाल चुकचुकली, महाराज!!
उधोजीराजे : (तगमग होत) काय होईल? कस्सं होईल? काल रात्री आमच्या डोळियांस डोळा लागला नाही!
संजयाजी फर्जंद : (आणखी थंडपणाने) काय हुईल, कस्सं हुईल? काय हुईल कस्सं हुईल...उगा कशापायी इत्कं मनावर घेताय, महाराज! गद्दारांचा गेम ओव्हर झालाय, मी सांगतोय ना!
उधोजीराजे : (अचंब्यानं) तुम्हाला बऱ्या शत्रूच्या गोटातल्या खबरी कळतात!
संजयाजी फर्जंद : (मिशीला पीळ देत) हमारे आदमी चारो तरफ फैले हुये है...
उधोजीराजे : (उतावळेपणाने) कधी लागेल हो निकाल? किती वाट पाहायची? काय होईल? कस्सं होईल?
संजयाजी फर्जंद : (बेदरकारपणाने दातात काडी घालत) हुईल तवा हुईल! जे चाललंय, ते काय वायट आहे? करा आराम!! जय महाराष्ट्र!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.