Pune BJP : पुण्यात सर्वसमावेशक नेतृत्वाची भाजपला गरज

आगामी निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या निमित्ताने उभे राहिलेले आव्हान विचारात घेऊन पुणे शहर भाजपला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे.
Pune BJP
Pune BJPesakal

आगामी निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या निमित्ताने उभे राहिलेले आव्हान विचारात घेऊन पुणे शहर भाजपला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. संघटनात्मक बांधणीबरोबरच शहराच्या प्रश्‍नांची जाण असणारे आणि जनतेशी सुसंवाद साधणारे नेतृत्व देताना पक्षाचा कस लागणार आहे.

व्यक्तीपेक्षा संघटनेला महत्त्व देणारा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जाते. मजबूत संघटनेच्या बळावर पक्षाला राज्यातच नव्हे, तर देशातही सत्ता मिळविण्यात यश आले. आज मात्र पाया असलेले संघटन काहीसे विस्कळित झाल्याने पुण्यासह राज्यात पक्षाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूक आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत याचे प्रत्यंतर पाहायला मिळाले. भाजपने ही बाब गांभीर्याने घेत पुन्हा एकदा संघटना मजबूत करण्याकडे कल वळविल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यातूनच राज्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्यातील संघटनात्मक बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Pune BJP
Two Wheeler : दुचाकीवर ट्रिपलसीट जाताय! तर मग हे वाचाच

पुण्यात गुरुवारपासून (ता. १८) भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्यावरून भाजपच्या दृष्टीने शहराचे महत्त्व अधोरेखित होते. माजी खासदार अण्णा जोशी, प्रदीप रावत, अनिल शिरोळे, गिरीश बापट, माजी आमदार विजय काळे, विश्‍वास गांगुर्डे यांच्यासह अनेक नेत्यांनी याआधी पुणे शहर भाजपचे नेतृत्व केले.

आज मात्र शहरात पक्षीय पातळीवर सर्वमान्य नेतृत्वाची पोकळी दिसून येत आहे. यापूर्वीही पक्षात गटबाजी होती. परंतु नेतृत्वाच्या धाकापुढे गटबाजी वेळप्रसंगी दबली जात होती. आज तशी परिस्थिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाच्या जोरावर भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता मिळाली. शहरात २०१४ मध्ये पक्षाचे आठ आमदार आणि खासदार निवडून आले.

दुसऱ्या फळीतील नेतृत्वाला संधी

अन्य पक्षांच्या तुलनेत शहर भाजपमध्ये दुसऱ्या फळीतील नेतृत्वालाही लवकरच संधी मिळाली. तरीही यातून शहरात मान्य होईल, असे नेतृत्व पक्षातून उभे राहिले नाही ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये असलेली स्पर्धा याला कारणीभूत असल्याचे मानले जाते. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आमदार झाले, परंतु अजूनही त्यांच्यावरील ‘बाहेर’चा हा शिक्का पुसला गेलेला नाही. तो जाऊ नये, यासाठी पक्षातीलच काहीजण हातभार लावत असल्याचे अनेकदा दिसून आले.

Pune BJP
Pune Villages : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेली २३ गावे ‘आगीतून फुफाट्यात’!

बापट असताना त्यांना मानणारा एक गट होता. परंतु पक्ष सत्तेत आल्यानंतर पक्षाकडून बापट यांना हळूहळू दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्या गटानेही हळूहळू चंद्रकांतदादा यांच्याशी जवळीक साधली. एकीकडे दादा गट जोर धरत असताना २०१९ मध्ये सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक पुण्यात काही जणांना बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरातील या दोन्ही गटांतील सुप्त संघर्ष लपून राहिला नाही. उमेदवारी वाटपापासून ते पक्षातील संघटनात्मक नियुक्त्या करताना हे दिसून आले.

राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवरील सावट आता दूर झाले आहे. येत्या काळात आता महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठी पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे.

त्यातूनच संघटनात्मक बदलला वेग आला आहे. जगदीश मुळीक यांची अध्यक्षपदाची मुदत संपली आहे. आगामी निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या निमित्ताने उभे राहिलेले आव्हान विचारात घेऊन शहराला आक्रमक नेतृत्वाची गरज असल्याची भावना पक्षातून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबरच जुन्या आणि नव्यांना बरोबर घेऊन जाणारा, पक्षातील गटबाजीला हवा न देता त्यांच्यात समतोल साधत संघटन मजबूत करणाऱ्या नेतृत्वाची गरज पक्षाला आहे. मुळीक यांच्याबरोबरच मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, राजेश पांडे आदी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

पक्षनेतृत्वाचा लागणार कस

शहराची ही गरज असताना दुसरीकडे प्रदेश पातळीवरही संघटनात्मक जबाबदारी संभाळणाऱ्यांची गरज पक्षाला भासत असल्याने मुरलीधर मोहोळ यांची प्रदेश सरचिटणीसपदी फेरनियुक्ती करण्यात आली. शहर भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. महापौर पदाच्या काळात मोहोळ यांना आपली राजकीय प्रतिमा उंचविण्यात यश आले. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामांच्या निमित्ताने शहरात त्यांची ओळख निर्माण झाली. मध्यंतरी त्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले.

पांडे हे मूळचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते. १९८२ मध्ये ते संघटनेत सक्रिय झाले. ११ वर्ष संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केल्यानंतर पुणे महानगर, जिल्हा आणि प्रदेश संघटनमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. उत्तर महाराष्ट्र सिनेट सदस्य, महाराष्ट्र विद्यापीठ हेल्थ सायन्सचे सिनेट सदस्य, राष्ट्रीय युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट काऊन्सिलचे राज्यपाल नियुक्त सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. शिक्षण, सहकार आणि भाजपच्या विचार परिवारातून आलेल्या पांडे यांनी २००६ मध्ये भाजपमध्ये सक्रिय झाल्यानंतर महानगर संघटन सरचिटणीस, पुणे शहर संघटन मंत्री अशा विविध पदांवर काम केले.

गेल्या आठवड्यात प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी पुणे दौऱ्यात शहराध्यक्षपदासाठी चाचपणी केली. शहरातील पन्नास पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. पुण्याची राजकीय संस्कृती आणि महाविकास आघाडीचे आव्हान विचारात घेऊन पक्षाला अध्यक्षपदाची निवड करावी लागणार आहे. हे करतानाच संघटनात्मक बांधणीबरोबरच शहराच्या प्रश्‍नांची जाण असणारा, कार्यकर्त्यांना बरोबर घेणारा आणि जनतेशी सुसंवाद साधणारे नेतृत्व देण्यासाठी पक्षाचा कस लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com