
कोंढव्यात नाल्यावर अनाधिकृत रस्त्याची बांधणी
कोंढवा - भैरोबानाला येथे अनधिकृत सिमेंटचे पाईप टाकून रस्ता बांधण्यात आला आहे. सर्व्हे क्रमांक ४१/२ येथे अशोका म्यूजशेजारी भैरोबा नाल्यावर बांधण्यात आलेल्या या अनाधिकृत रस्त्याच्या विरोधात इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुपकडून विरोध करण्यात आला आणि काही काळ धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून त्याच्यावर दगड-माती विटा रचून महापालिकेची सुरक्षा भिंत तोडून अनाधिकृतरित्या कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे.
सध्या पावसाचे दिवस असून या नाल्याचे पात्र मोठे आहे आणि या रस्त्याच्या कामामुळे ते छोटे झाले आहे. या भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून येथील नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नाल्यावरती महाराष्ट्र राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे स्वखर्चाने पक्के सिमेंट काँक्रीटचे पूल बांधून वहिवाट करण्याचे नमूद केलेले असताना हा रस्ता चुकीच्या पद्धतीने बांधला गेला असून नागरिकांना याचा त्रास होऊ नये, किंवा पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आम्ही हा विरोध करत असल्याचे इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या असलम बागवान यांनी सांगितले. यावेळी रियाज मुल्ला, राजू सय्यद, सचिन आल्हाट, ऋषिकेश गायकवाड, इब्राहिम खान, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.
कायद्यात ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार याठिकाणी नाल्यावर कल्व्हर्ट करून रस्ता करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु ओढ्यावर टाकण्यात आलेला हा बांध बेकायदेशीर आहे. त्यामुळे कायदेशीर बाबी तपासून यावर लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- राहूल साळुंके, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका.
Web Title: Unauthorized Road Construction On Nala In Kondhwa Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..