Undri: ससाणेनगर रेल्वेगेट येथील चढामुळे अपघाताचा धोका वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ससाणेनगर रेल्वेगेट येथील चढामुळे अपघाताचा धोका वाढला

उंड्री : ससाणेनगर रेल्वेगेट येथील चढामुळे अपघाताचा धोका वाढला

उंड्री : पुणे-सांगली-कोल्हापूर या लोहमार्गावर ससाणेनगर (रेल्वे गेट क्र.७) येथे एकदम चढ आणि खड्डेमय रस्ता असल्याने पाण्याचे टँकर, बस, टेम्पो घसरून वाहनचालकांमध्ये तूतू मैमै चे प्रकार वाढले आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून, भांडणाचे प्रकार दररोज घडत आहेत. महापालिका प्रशासनाने लोहमार्गावर जाण्यापूर्वीच्या रस्त्याचा उंचवटा कमी करून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

अर्जुन सातव म्हणाले की, ससाणेनगर गेट क्र.७ येथून हांडेवाडी रोडमार्गे चिंतामणीनगर, उंड्री, महंमदवाडी, सय्यदनगर, वाडकरमळा, उद्योगनगर, होळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी परिसरात पाण्याचे टँकर, बस, सरकारी टेम्पो आदी वाहनांची सतत वर्दळ असते. रेल्वेगेट ओलांडताना एकदम चढ असल्याने वाहन बंद पडल्यानंतर पाठीमागील वाहनांना वारंवार अपघात होत असल्याच्या घटना वारंवार होत आहेत.

हेही वाचा: गोऱ्हे बुद्रुक : रानडुकरांचा हैदोस; ऊस व भात शेतीचे नुकसान

स्थानिक नागरिक विकास भुजबळ, शिवा शेवाळे, अलोक गायकवाड, संजय शेटे, संजय भुजबळ, पोपट वाडकर, विनीत थोरात, अमित घुले, मंगेश ससाणे यांनी या रस्त्याची दुरुस्ती आणि रेल्वेगेटवरील चढ कमी करण्यासाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, कोरोनामुळे आतापर्यंत अनेक कामे रखडली होती. आता कामे सुरू केली असून, लवकरच रेल्वे गेटवरील रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top