Pune पीएमपी बसथांब्यावर रिक्षाचालकांचे अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pmp

Pune : पीएमपी बसथांब्यावर रिक्षाचालकांचे अतिक्रमण

उंड्री : सय्यदनगर-हांडेवाडी रस्त्यावरील पीएमपी बसथांब्यावर रिक्षा आणि फळविक्रेत्यांनी बस्तान बसविले आहे. रिक्षाचालकांच्या दादागिरीमुळे बसचालक बसेस अर्ध्या रस्त्यात किंवा मागे-पुढे थांबवितात, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला-मुलींची मोठी अडचण होत आहे. पीएमपी बस प्रवाशांसाठी आहे की, वाहक-चालकांसाठी आहे, असा संतप्त सवाल ज्येष्ठ प्रवाशांनी उपस्थित केला.

हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर, सातवनगर बसथांब्यावर शाळ-कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे शाळा-कॉलेज सुरू आणि सुटण्याच्या वेळी बसचीसंख्या वाढवून गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांच्या वतीने इंदिरानगरमधील हाफीज अजिम खान, सातवनगरमधील गणेश वाडकर यांनी केली.

पदपथ पादचाऱ्यांसाठी उभारले आहेत. मात्र, पीएमपी प्रशासनने पदपथावरच पीएमपीचा बसथांबा उभारला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून रस्त्याने चालावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.

वृषाली वाडकर, सातवनगर

पीएमपी बस प्रवाशांसाठी आहे की, वाहक आणि चालकांसाठी आहे. बस थांब्यावर न थांबविता अर्ध्या रस्त्यात किंवा मागे पुढे थांबवून ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांच्या जीवाशी खेळ प्रशासनाने थांबवावा, अन्यथा बससेवा बंद करावी.

- वैष्णवी सातव, सातवनगर

बसथांब्यासमोर चिखल असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय होत आहे. बसथांब्यासमोर गतिरोधक असल्याने वाहनांची गर्दी होते, त्यामुळे बस प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- मीना कट्टीमनी

दरम्यान, हडपसर आगारप्रमुख समीर आत्तार म्हणाले की, पीएमपी बस नागरिकांच्या सेवेसाठी आहे, यापुढेही असणार आहे. मात्र, बस थांब्यावर न थांबविता रस्त्यात किंवा मागे पुढे थांबविली, तर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. प्रवाशांच्या सूचनांची वेळीच अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.