Pune News : औषध निरीक्षकांची पदभरती रखडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unemployment Recruitment of drug inspectors stopped student job pune

Pune News : औषध निरीक्षकांची पदभरती रखडली

पुणे : लातूरच्या दुर्गम भागातून आलेला राकेश २०१७ मध्ये औषधनिर्माणशास्रातील पदवीचे शिक्षण पूर्ण करतो. कुटुंबाची गरज म्हणून तीन वर्षे नोकरीही करतो. पुढे औषध निरीक्षकाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर, तो खासगी नोकरीला रामराम करत स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतो.

मात्र, १६ महिने उलटले तरी औषध निरीक्षकाची पदभरती निघाली नाही. तर दूसरीकडे पुढील काही दिवसात जाहिरात निघाली नाही, तर वर्षभर वाट पाहण्याची वेळ त्याच्यावर येणार आहे. राकेश सारखे अनेक उमेदवार सध्या औषध निरीक्षकाच्या जाहिरातीची वाट पाहत आहे.

एमपीएससीच्या वतीने राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची जाहिरात घोषीत करण्यात आली आहे. मात्र, त्यात अजूनही औषध निरीक्षकांच्या पदांचा समावेश नाही. नोव्हेंबर २०२१ पासून अन्न व औषध प्रशासन विभागातील ८७ औषध निरीक्षकांच्या पदांची जाहीरात निघाली होती.

मात्र, अनुभवाच्या अटीमुळे पदभरती वादात सापडली होती. ही अट रद्द करावी म्हणून उमेदवारांनी आंदोलन केले होते. त्यामुळे एमपीएससीने पदभरतीला स्थगिती दिली होती. अखेरीस अनुभवाची अट रद्द करत नवीन सेवा नियम अधिनियम घोषित करण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया लांबल्यामुळे पदभरती रखडल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

उमेदवार विचारतात...

- सेवा प्रवेश नियम बदलून तातडीने जाहिरात का निघाली नाही?

- नवीन सेवा नियमाच्या अंमलबजावणीचे घोडे नक्की आडले कोठे?

- संबंधीत विभागाकडून एमपीएससीला पदभरतीच्या सूचना केंव्हा जाणार?

- पूर्व परीक्षेच्या आत औषध निरीक्षकांची जाहिरात प्रसिद्ध होणार का?

उमेदवारांच्या अडचणी..

- १६ महिन्यांनतरही जाहिरात प्रसिद्ध नाही. या महिन्यात जाहिरात निघाली नाही, तर पुन्हा वर्षभर थांबण्याची वेळ

- परीक्षा लांबल्यास अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली जाणार

- परीक्षा नक्की केंव्हा होणार, या बद्दल शाश्वतता नसल्याने मानसिक चिंता वाढली

आकडे बोलतात....

- औषध निरीक्षकांची रिक्त पदे ः ११७

- इच्छूक उमेदवारांची अंदाजे संख्या ः १ लाख

अनुभवाची जाचक अट रद्द झाल्यानंतर, तातडीने औषध निरीक्षकांची भरती व्हायला हवी होती. मात्र, १६ महिन्यानंतरही कोणतीच जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे आमच्या सारख्या उमेदवारांनी हालापेष्टा सहन करत केलेला अभ्यासाचे काय करायचे, असा मोठा प्रश्न पडला आहे.

- राहुल पवार, उमेदवार

टॅग्स :unemployedMedical