ममता बाल सदनच्या मुलींकडून राज्यपालांना राखी

ममता बाल सदनच्या मुलींकडून राज्यपालांना राखी
Published on

मुंबई, ता. २९ : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील ममता बाल सदनमधील मुलींनी मंगळवारी (ता. २७) राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. लोकभवन येथे झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी मुलींशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी अनाथ मुली, दिव्यांग भगिनी, स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही राज्यपालांना राखी बांधली. राज्यपाल म्हणाले, ‘‘समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा हा पवित्र सण आहे. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींसोबत हा सण साजरा करताना आनंद होत आहे.’’ राज्यपालांनी प्रत्येक मुलीचे नाव, शिक्षण आणि ध्येयाबाबत विचारपूस करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी राज्यपालांना विदर्भाचा प्रसिद्ध ‘गोरसपाक’ भेट दिला.
कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, अधीक्षिका स्मिता पानसरे आणि ममता बाल सदनच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

राज्यपालांना भावले आकांक्षाने काढलेले स्केच
ममता बाल सदनची विद्यार्थिनी आकांक्षा भगत हिने राज्यपालांचे रेखाटलेले सुंदर स्केच त्यांना भेट दिले. हे स्केच पाहून राज्यपाल भारावून गेले. ‘बेटा, तुम्ही खूप मोठे कलाकार व्हाल,’ अशा शब्दांत त्यांनी आकांक्षाचे कौतुक केले. आकांक्षा सध्या पुण्याच्या अभिनव आर्ट कॉलेजमध्ये कमर्शिअल आर्टचे शिक्षण घेत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com