उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहिणींकडून शुभेच्छांचे अनोखे गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

पवार घराण्यातील सर्व बहिणींनी त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सचा आधार घेत शुभेच्छा दिल्या.

पुणे : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस असतो. त्यामिनित्ताने राष्ट्रवादी पक्षाबरोबर पवार घराण्यातील सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण यावेळी कोरोनाच्या कारणास्तव पवार कुटुंबियातील सगळ्या बहिणींनी त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सचा आधार घेत शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरे म्हणाले, अजितदादांचे निर्णय नेहमीच...

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्या म्हणतात, ''महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचा दादा Ajit Pawar यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व बहिणींनी एकत्र येऊन शुभेच्छा दिल्या. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे आम्ही सर्वजण एका ठिकाणी जमू शकलो नाही. त्यामुळे यावर्षी आम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सचा आधार घेतला.''

सुळे पुढे म्हणाल्या, यावेळी माझ्यासोबत प्रफुल्ला भोसले,रजनी इंदूलकर,विजया पाटील,निमा माने, निता पाटील, शमा पवार आणि आश्विनी पवार होत्या. दादा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

बर्याच ठिकाणी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाग्रस्त परिसरासाठी मदतीचा हात देण्यात आला. तसेच लाॅकडाउनमुळे गैरसोय होणार्या नागरिकांना मदत करण्यात आली. काही ठिकाणी रक्तदानासारखे उपक्रम घेण्यात आले. या माध्यमातून पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

अमोल कोल्हे म्हणतात, अजितदादांची सौंदर्यदृष्टी चकीत करणारी... 

अजित पवार यांनी मानले जनतेचे आभार- आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झालाच, शिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी आज वाढदिवस साजरा केला नाही. मात्र, दूरध्वनीद्वारे तसेच डिजिटल माध्यमातून आलेल्या शुभेच्छांचा त्यांनी आवर्जून स्विकार केला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या असून वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात या सदिच्छांनी मला नेहमीच बळ दिले आहे. या सदिच्छा कायम माझ्यासोबत असतील असा विश्वासही अजित पवार यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार मानताना राज्यातील जनतेने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू मार्गदर्शक सूचना, आदेश, नियमांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी स्वत:च्या, कुटुंबाच्या तसेच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique greetings from sisters to Deputy Chief Minister Ajit Pawar