#LanguageLab पुण्यात अनोखी भाषा प्रयोगशाळा

शरयू काकडे 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - आपल्याला कोणतीही नवीन भाषा शिकायची, तर शिक्षकाची गरज असते, पण आधुनिक काळात संगणक हाच भाषा शिकविणारा शिक्षक झाला तर... ही केवळ कल्पना नसून प्रत्यक्षात साकारली आहे ती आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेने. रागावून, ओरडून, मारून भाषा शिकविणाऱ्या काही शिक्षकांपेक्षा चिडचिड न करणारा संगणक विद्यार्थ्यांना मित्र वाटू लागला आहे. असा हा वेगळा शैक्षणिक प्रयोग पुण्यात सुरू आहे.   

पुणे - आपल्याला कोणतीही नवीन भाषा शिकायची, तर शिक्षकाची गरज असते, पण आधुनिक काळात संगणक हाच भाषा शिकविणारा शिक्षक झाला तर... ही केवळ कल्पना नसून प्रत्यक्षात साकारली आहे ती आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेने. रागावून, ओरडून, मारून भाषा शिकविणाऱ्या काही शिक्षकांपेक्षा चिडचिड न करणारा संगणक विद्यार्थ्यांना मित्र वाटू लागला आहे. असा हा वेगळा शैक्षणिक प्रयोग पुण्यात सुरू आहे.   

भाषा कोणतीही असो, ती ऐकून, बोलून, लिहून, वाचून आत्मसात होते. भाषा शिकण्याचे नेमके तंत्र लक्षात घेऊन ‘चंद्र-प्रकाश लॅंग्वेज लॅब’ स्थापण्यात आली आहे. प्रकाश धोका यांनी ही लॅब उभारण्यास सहकार्य केले आहे. त्यात भाषा आणि अद्ययावत तंत्रज्ञाना यांचा ताळमेळ घातला आहे. विविध भाषा शास्त्रोक्त पद्धतीने शिकण्यासाठी ‘भाषा प्रयोगशाळा’ कार्यरत आहे. सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत, राष्ट्रभाषा हिंदी, जागतिक भाषा इंग्रजीसह जर्मन या परकी भाषांचे धडे या लॅबमध्ये दिले जातात. संगणकाच्या माध्यमातून भाषा शिकण्यासाठी उपयुक्त अद्ययावत तंत्रज्ञान या शाळेत उपलब्ध आहे. त्या त्या भाषेतील शब्दांपासून शिकविण्याची सुरवात होते. त्यानंतर अवघड होत जाणारी प्रत्येक ‘लेव्हल’ हा संगणक शिकवतो. यात विद्यार्थ्यांना अनुक्रमे शब्द, वाक्‍य, लघू परिच्छेद, दीर्घ परिच्छेद शिकवले जातात. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

उच्चारातील चुकाही सुधारू शकतो 
श्रवणकौशल्यांच्या आधारे सोप्या पद्धतीने विविध भाषा शिकविल्या जातात. या भाषा प्रयोगशाळेत ६० संगणक असून, त्यावरील फिनलॅण्ड अभ्यासक्रमावर आधारित ‘सनेको’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भाषा शिकविल्या जातात. विद्यार्थी त्या त्या भाषेतील संवाद ऐकून, उच्चारणाचा शास्त्रोक्त सराव करू शकतात. तसेच उच्चारणांतील चुका संगणकाच्या साह्याने निदर्शनास आणून सुधारणा करू शकतात. त्यानंतर वाचन आणि लेखनकौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतात. 

 संगणकाच्या साहाय्याने भाषा कशी बोलायची, योग्य शब्द कसे उच्चारायचे, शब्दसंपदा कशी वाढवायची, हे विद्यार्थी शिकू शकतात. या तंत्रज्ञानामुळे भाषाकौशल्यांचा विकास होईल. ही भाषा प्रयोगशाळा सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
- माधवी देसाई, प्राचार्या, आचार्य श्री विजय वल्लभ प्रशाला

संगणकाच्या मदतीने भाषा शिकताना शब्दांचा उच्चार कसा करावा, यामध्ये अधिक स्पष्टता आली. त्यामुळे बोलताना अथवा संवाद साधताना दडपण जाणवत नाही.
- वसुंधरा शर्मा, विद्यार्थिनी

भाषा प्रयोगशाळेच्या माध्यमातून भाषिक कौशल्ये शिकत असल्यामुळे आत्मविश्वासाची शिदोरी मिळणार आहे.
- हर्ष शाह, विद्यार्थी

Web Title: Unique Language Lab in Pune