रंगाची अनोखी उधळण

गौरी गोखले 
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - एरवी होळी-रंगपंचमी म्हटले, की सोसायटीत ठराविक जणांनी एकत्र यायचे आणि गाणी लावून रंगांची उधळण करायची, असे चित्र पाहायला मिळतं. यात एकमेकांना आनंद मिळत असला, तरी पाणी वाया जाण्याबरोबरच रंगांमुळे सोसायटीचा परिसर बेरंग होणार हे ठरलेलंच; पण याच रंगांची योग्य ठिकाणी उधळण झाली आणि त्यात सर्वांचा सहभाग असला, तर काय होते, याचे आगळे उदाहरणच बाणेरमधील योगी पार्क परिसरातील पियोनी हौसिंग सोसायटीने घालून दिले. सोसायटीमधील आबालवृद्धांनी एकत्र येऊन सोसायटीमधील भिंत आकर्षक रंगसंगतीने रंगवून काढली आणि अनोखी रंगपंचमी साजरी केली.  

 सोसायटीतील सर्वांनी ब्रश हातात घेऊन आपल्या मनपसंत रंगांची पेरणी केली आणि भिंतीवर निसर्गाचे आगळे-वेगळे रूप साकारले. अश्‍विनी आणि राजीव रुद्राक्षी व रमेश माळगे इथले रहिवासी आहेत, ज्यांनी मोठ्या हौसेने या नवीन प्रकारच्या रंगांची उधळण करण्याची कल्पना मांडली आणि आम्ही सर्वांनी प्रथमच हातात ब्रश व रंग घेऊन वेगवेगळ्या छटांना रंग दिला. एरवी सोसायटी म्हटले, की शेजारी कोण राहतो, हेही माहिती नसते; पण हे सर्व भेदाभेद गळून सर्व जण एकदिलाने आणि कोणतीही सक्ती न करता आनंदाने एकत्र आले आणि खऱ्या खुऱ्या रंगांची उधळण झाली. २०१० मध्ये सोसायटीची उभारणी झाली, तेव्हापासून ही भिंत तशी काळवंडलेल्या अवस्थेत होती. ती होळीच्या दिवशी रहिवाशांनीच एकत्र येऊन स्वच्छ केली. त्यावर खडूने चित्र रेखाटली. त्यात सूर्योदय, फुले व पाने, फुलपाखरू, हरिण, पक्षी अशा एक ना अनेक प्रकारे निसर्ग साकारला गेला आणि त्यात सोसायटीमधील रहिवाशांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे विविध रंग भरले. आणि त्यातून एक सुरेख निसर्ग चित्र आकाराला आले. अनेकांनी यानिमित्ताने पहिल्यांदाच ब्रश हातात धरला, हा अनुभव प्रत्येकासाठी वेगळाच आनंद देणारा आणि एकीचे दर्शन घडविणारा होता. 

भिंतच ठरली सेल्फी पॉइंट
भिंतीवरची रंगांची उधळण झाल्यावर सर्वांनी रंगांची मजा घेतली, ती एकमेकांना रंग लावून रंग खेळण्यात. एका सोसायटीत राहणारे रोज एकमेकांना येता-जाता केवळ हाय, हॅलो करणारे आज एक दुसऱ्यांना रंग लावून सणाचा आनंद घेत होते. हा दिवस सोसायटीतील एक अविस्मरणीय दिवस ठरल्याच्या भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या. मोबाईल सेल्फीच्या जमान्यात ही भिंतच सेल्फी पॉइंट ठरलीय.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unique rangpanchami in pune