
केटरिंग व्यवसायाच्या आवडीतून मदनाल यांनी २००७ मध्ये ‘डिलाईट केटरिंग सर्व्हिसेस’ सुरू केले.
केटरिंग व्यवसायासाठी अनोखे स्टार्टअप!
पुणे - हाती असलेले पैसे गुंतवून सुरू केलेला भाजीपाला पॅकिंगचा व्यवसाय फसला म्हणून मिळेल ती नोकरी करण्याची वेळ सोलापूरवरून पुण्यात आलेल्या एका १९ वर्षीय तरुणावर २००० मध्ये आली. अनेक प्रयत्नांतून वेटरची नोकरी मिळाली. मात्र, दिवसाला ५० रुपये मिळत असलेल्या या तरुणाने केवळ नोकरीच न करता सहा महिन्यांत केटरर्सना वेटर्स देण्याचे काम सुरू केले. तेथून प्रवास सुरू झालेल्या या तरुणाने आज स्वतःचे स्टार्टअप सुरू केले. कधी काळी वेटर असलेल्या नित्यानंद मदनाल यांनी ‘पुणे केटरिंग कंपनी’ (Pune Catering Company) च्या माध्यमातून केटरिंग व्यवसायिकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
केटरिंग व्यवसायाच्या आवडीतून मदनाल यांनी २००७ मध्ये ‘डिलाईट केटरिंग सर्व्हिसेस’ सुरू केले. त्यानंतर आता त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलेले त्यांचे मित्र पुष्कराज गुप्ता यांच्यासोबत हे स्टार्टअप सुरू केले आहे.
गुणवत्तापूर्ण उत्पादनांना मागणी
विशिष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले अनेक स्नॅक्स सेंटर्स, रेस्टॉरंट्स, मिठाईवाले, बेकरी, डेअरी व केटरर्स या स्टार्टअपने निवडले आहेत. पीसीसीच्या रूपाने समाजातील इतर सर्व घटकांना सोबत घेऊन आमच्या व्यवसायाला आम्ही व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहोत. गुणवत्तापूर्ण उत्पादनांना वर्षभर चांगली मागणी असते, अगदी दिवाळीच्या फराळालासुद्धा... हे आत्तापर्यंतच्या अनुभवातून समजले आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
स्टार्टअपची वैशिष्ट्ये...
नाश्ता, जेवण, हायटीसह भरपूर प्रकारचे मेन्यू पुरवते
महाराष्ट्रीय, पंजाबी, कॉन्टिनेंटल, ओरिएन्टल, थाई, मेक्सिकन असे खाद्यपदार्थ
सर्व प्रकारचे पदार्थ घरपोच मिळतात
व्हॉटस्अॅपवर मेन्यू कार्ड मिळते
त्यातून आवडीचे मेन्यू निवडणूक ऑर्डर देता येतील
स्टार्टअपच्या माध्यमातून अनेकांची उलाढाल वाढणार
फूड इंडस्ट्री ही एक छोटीशी अर्थव्यवस्थाच आहे. जिथे मंदीला फारसा वाव नसतो. कारण, माणसाचे खाणे कधी थांबत नाही. आज पुण्याची लोकसंख्या पुणे शहर, जिल्हा व पिंपरी-चिंचवड मिळून ७० लाखांच्या आसपास आहे. हे एक प्रचंड मोठे मार्केट आहे आणि चांगल्या उत्पादनासाठी ग्राहकवर्ग आहे. हे सगळे व्यावसायिक व हा प्रचंड मोठ्या संख्येने असलेला ग्राहकवर्ग यांना जोडण्याचे काम पीसीसीच्या प्लॅटफॉर्मवरून होईल. पीसीसीच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिक आणि कष्टाळू व्यावसायिकांसाठी एक ‘व्यावसायिक व्यासपीठ’ उपलब्ध करून देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत.
- नित्यानंद मदनाल, सहसंस्थापक, पुणे केटरिंग कंपनी
Web Title: Unique Startup For Catering Business
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..