विद्यापीठाच्या दिरंगाईचा फटका

ब्रिजमोहन पाटील 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेची निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब केला. त्याचा फटका पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेची निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब केला. त्याचा फटका पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. दुसऱ्या सत्राचे वर्ग सुरू झाले असतानाच सव्वा महिना उशिराने पहिल्या सत्रातील विषयांची ऑनलाइन परीक्षा देण्याची वेळ  विद्यार्थ्यांवर आली आहे. आता नवीन वेळापत्रकानुसार २२ जानेवारीपासून परीक्षा सुरू होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात एका सत्राला २५० गुणांची ऑफलाइन व २५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. त्यासाठी प्रत्येकी पाच विषय आहेत. पुणे विद्यापीठाने नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात द्वितीय वर्षाच्या ऑफलाइन व ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक तयार केले. त्यात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षा होणार होत्या. मात्र, परिपत्रक काढून अचानक ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलल्या. दुसरे सत्र १६ डिसेंबरपासून सुरू झाले, तरीही पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा कधी होणार?, याचे उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. 

दरम्यान, पुणे विद्यापीठाने १४ जानेवारी रोजी सर्व महाविद्यालयांना २२ ते २७ जानेवारीदरम्यान अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या सर्व शाखांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्राचा अभ्यास सोडून पुन्हा पहिल्या सत्राचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचा परिणाम त्यांच्या निकालावरही होण्याची शक्‍यता आहे, असे प्राध्यापकांनी सांगितले.

बॅकलॉकचीही परीक्षा
अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम २०१९ मध्ये बदलला. त्यात ऑनलाइन परीक्षा नाही. मात्र, आता जे विद्यार्थी द्वितीय वर्षात आहेत, त्यातील काही जण प्रथम वर्षात काही विषयात नापास झाले आहेत. त्यांचीही परीक्षा २२ जानेवारीपासून होणार आहे.  

ठेकेदार नवीन म्हणून उशीर 
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले, ‘‘अभियांत्रिकीच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक तयार केले होते. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली. यातून नवीन ठेकेदार नेमला गेल्याने त्याला सर्व यंत्रणा समजून घेऊन ऑनलाइन परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मुदत देणे आवश्‍यक होते. त्यामुळे डिसेंबरमधील परीक्षा रद्द केली. आता नवीन वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेतल्या जातील.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University delay