विद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून उन्नती प्रकल्प 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने "अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे. इयत्तेनुसार शिक्षकांना निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार शाळांचा सर्वे करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासली जाणार आहे. येत्या जानेवारीपासून "उन्नती प्रकल्प' राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी दिली. 

"उन्नती प्रकल्प' राबविण्यासाठी महापालिकेने सप्टेंबर महिन्यात शाळांची पाहणी केली. त्यात तपासणीअंती अप्रगत विद्यार्थ्यांची अध्ययन स्तरनिश्‍चिती करण्यात आली आहे. अप्रगत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार केला आहे. दिलेल्या मुदतीत आणि दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांची प्रगती नसेल तर अशा शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांना नोटीसही देण्यात येणार आहे. 

असा आहे उन्नती प्रकल्प 
प्रत्येक विद्यार्थ्याला अक्षर - अंकओळख, वाचन, लेखन, गणिती क्रिया यांचे ज्ञान असावे, यासाठी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी अध्ययन स्तर निश्‍चितीसाठी उन्नती हा प्रकल्प घेतला आहे. याद्वारे सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल. यात शून्य ते चार अशा क्रमानुसार विद्यार्थ्यांचा गुणवत्ता स्तर तपासला जाईल. त्यानुसार शून्य स्तर असलेल्या विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नोंद शिक्षक ठेवणार आहेत. ही माहिती मुख्याध्यापकांना दिली जाईल. त्यानंतर ती माहिती पर्यवेक्षकांकडे जमा होईल. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे लक्ष दिले जाणार आहे. 

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते, असा सर्वसाधारण समज दूर करण्यासाठी अध्ययन स्तरनिश्‍चिती करण्यात आली. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी डिसेंबरपर्यंत शिक्षकांना मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीनंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी "गुणवत्ता तपासणी' टीम तयार केली जाणार आहे. त्यात सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश करत त्यांनाही या गुणवत्तावाढ प्रक्रियेत सहभागी करून घेणार आहे. 
- प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती, शिक्षण समिती 

Web Title: Unnati Project from January for students in municipal school