

भारतीय अर्थव्यवस्थेवर येईल ताण
आयातशुल्काचा परिणामांबद्दल ‘केअर एज रेटिंग्ज’चा अंदाज
नवी दिल्ली, ता. ८ (वृत्तसंस्था) : रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेने १०० टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते, महागाई वाढू शकते आणि चालू खात्याच्या तुटीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘केअर एज रेटिंग्स’चे मुख्य रेटिंग अधिकारी सचिन गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
गुप्ता यांच्या मते, इराणमधील संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत आधीच अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत भारताला रशियन तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास भाग पाडले, तर जागतिक तेल पुरवठ्यावर प्रचंड दबाव येईल. यामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे जाऊ शकतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे दर ११० ते १२० डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, त्याचा भारताच्या आर्थिक निर्देशांकांवर गंभीर परिणाम होईल. जुलै महिन्यात भारताच्या एकूण तेल आयातीपैकी रशियाचा वाटा सुमारे ५० टक्के होता. जर भारत आणि चीन रशियन तेलाचा वापर कमी करू शकले नाहीत आणि अमेरिकेने १०० टक्के शुल्क लागू केले, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
तेल पुरवठ्यावर परिणाम
‘होर्मुझ’च्या सामुद्रधुनीमधील अडथळे कायम असताना रशियाच्या तेलाची आयात थांबल्यास जागतिक तेलाच्या पुरवठ्यापैकी ३० टक्के पुरवठ्यावर परिणाम होईल. कच्च्या तेलाचे दर ११० ते १२० डॉलरवर गेल्यास भारताची चालू खात्यातील तूट गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट होऊ शकते. महागाईवरही याचा परिणाम होणार असून, अशा परिस्थितीत सरकारला इंधनाच्या किमती वाढवून त्याचा भार ग्राहकांवर टाकावा लागू शकतो. त्यामुळे देशांतर्गत मागणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
कंपन्यांवर दबाव वाढेल
सरकार प्रति बॅरल १०० ते १०५ डॉलरपर्यंतचे दर हाताळू शकते, मात्र ११० डॉलरच्या पुढे तेल विपणन कंपन्यांवरील दबाव वाढेल. तरीही, भारताने नवीन देशांकडून तेल मिळवण्याची लवचिकता दाखवली असून ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देणे सुरूच ठेवेल, असेही केअर एज रेटिंग्स’चे सचिन गुप्ता यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.