पुण्याच्या वैदेहीचा अमेरिकेत डंका, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रेखाटले बोधचिन्ह

सम्राट कदम
Wednesday, 20 January 2021

अमेरिकेतील मेरिलॅण्ड राज्य येथील "थिंक वूमन' या संस्थेने स्त्रियांमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबाबत जागृती निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत प्रमुख बोधचिन्ह म्हणून वैदेही हिच्या चित्रकृतीचा वापर करण्यात आला. या चित्रकृतीचा वापर त्यांनी ऑनलाइन तसेच ऑफलाईन मोहिमेसाठी केला होता.

पुणे : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हा आपल्यासाठी नेहमीच चर्चेचा, अभ्यासाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. पण, या निवडणुकीत पुण्यातील युवा कलाकाराने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? अमेरिकेतील स्त्रियांमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूकीबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी "थिंक वूमन' या संस्थेने एक मोहीम राबविली होती. या मोहिमेत बोधचिन्ह म्हणून पुण्यातील वैदेही रेड्डी हिच्या चित्रकृतीचा वापर करण्यात आला होता. अशा पद्धतीने वैदेही हिने अमेरिकेच्या निवडणुकीत जनजागृतीसाठी हातभार लावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अमेरिकेतील मेरिलॅण्ड राज्य येथील "थिंक वूमन' या संस्थेने स्त्रियांमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबाबत जागृती निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत प्रमुख बोधचिन्ह म्हणून वैदेही हिच्या चित्रकृतीचा वापर करण्यात आला. या चित्रकृतीचा वापर त्यांनी ऑनलाइन तसेच ऑफलाईन मोहिमेसाठी केला होता. अधिकाधिक महिलांना मत देण्यासाठी प्रोत्साहित करणे, निवडणुकीतील महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांसोबत महिला मतदारांमध्ये जनजागृती करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. वैदेही हिच्या या चित्रकृतीमध्ये 'स्त्री'चे चित्रण असून ते सध्याच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहे. शिवाय ही कलाकृती या शतकातील 'स्त्री'च्या प्रेरणा, विचार व स्वप्न दर्शविते. म्हणूनच या चित्रकृतीची निवड "थिंक वूमन' संस्थेने केली होती. 

सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण

वैदेहीने या चित्राची निर्मिती 2018 मध्ये केली होती. ही चित्रकृती ऍबस्ट्रॅक्‍ट कंटेम्पररी स्टाइल या प्रकारात मोडते. वैदेहीला यापूर्वी अनेक सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी तिने 2014 साली राष्ट्रीय स्तरावरील गुगल डूडल स्पर्धा जिंकली होती. तसेच अनेक विदेशी सरकारी संस्थांनी तिच्या चित्रकलेतील योगदानाबद्दल तिचा सन्मान केला आहे. शिवाय ती अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉर्नल विद्यापीठाची सुमारे दोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळवणारी पहिलीच भारतीय विद्यार्थिनी ठरली होती. वैदेहीने आपले शालेय शिक्षण पुण्यातील आर्मी स्कूलमध्ये पूर्ण केले असून तिचे वडील भारतीय लष्करात कार्यरत आहेत.
 

आई-पप्पा माफ करा, आत्महत्या करतेय; तरुणीने फेसबुकवर पोस्ट केली आणि...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: use of the artwork of a young woman from Pune for public awareness in the US presidential election