आई-पप्पा माफ करा, आत्महत्या करतेय; तरुणीने फेसबुकवर पोस्ट केली आणि...

टीम ई सकाळ
Tuesday, 19 January 2021

एका तरुणीच्या फेसबुकवर "मी आयुष्यात जे ठरवले, ते साध्य करू शकले नाही, नोकरीही नाही. त्यामुळे आई-पप्पा मला माफ करा, मी आत्महत्या करण्यास जातेय' अशा पद्धतीचा मजकूर पोलिस उपायुक्तांना दिसला.

पुणे : "मी आयुष्यात जे ठरवले, ते साध्य करू शकले नाही, नोकरीही नाही. त्यामुळे आई-पप्पा मला माफ करा, मी आत्महत्या करण्यास जातेय' एका तरुणीने फेसबुवर लिहिलेली ही पोस्ट पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांना सोमवारी दुपारी अडीच वाजता दिसली. त्यांनी तत्काळ महिला पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देत मुलीचा शोध घेण्यास सांगितले.

महिला पोलिस अधिकाऱ्यांनीही दामिनी मार्शलला समवेत घेऊन क्षणाचाही विलंब न करता तरुणीचा शोध घेण्यास सुरवात केली. तरुणीच्या आई-वडिलांचा शोध घेतला, त्यानंतर मित्र-मैत्रिणींनी संपर्क साधला. अवघ्या साडे तीन तासताच तिचा ठावठिकाणा शोधून पोलिस तिच्यापर्यंत पोचले.तिची समजूत काढली, तिच्या मनातील आत्महत्येचा विचारही दूर सारला आणि तिला तिच्या पालकांकडे सुपूर्द केले.

हे वाचा - इलेक्शनचा विलक्षण फोटो : बायको असावी तर अशी !

पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग नेहमीप्रमाणे सोमवारी त्यांच्या कामाच्या गडबडीत होते. तेवढ्यात त्यांची फेसबुकवर नजर गेली. तेव्हा एका तरुणीच्या फेसबुकवर "मी आयुष्यात जे ठरवले, ते साध्य करू शकले नाही, नोकरीही नाही. त्यामुळे आई-पप्पा मला माफ करा, मी आत्महत्या करण्यास जातेय' अशा पद्धतीचा मजकूर पोलिस उपायुक्तांना दिसला. हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पुणे पोलिसांच्या "भरोसा'सेलच्या महिला सहाय्यता कक्षाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे यांना माहिती देऊन 30 वर्षीय तरुणीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

शानमे यांनी देखील क्षणाचाही विलंब न करता, कोथरूड-अलंकार पोलिस ठाण्याच्या दामिनी मार्शल वंदना रासकर यांना कल्पना देऊन तरुणीचा शोध घेण्यास सांगितले. तोपर्यंत शानमे यांनीही तांत्रिक माहितीच्या आधारे तिच्या आई-वडिलांचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर शानमे व रासकर यांनी तरुणीच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन तिची विचारणा केली. पोलिसांकडूनच आई-वडिलांना मुलीबाबत माहिती मिळाल्याने त्यांनाही मोठ्ठा धक्का बसला. 

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी​

पोलिस अधिकारी शानमे व दामिनी मार्शल रासकर यांनी तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी तिचा मोबाईल बंद आढळला. त्यानंतर त्यांनी तिच्या मित्र-मैत्रिणीच्या मोबाईलवर संपर्क साधला. बराच वेळानंतर एका मित्राकडे तिच्याविषयीची थोडी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिस तरुणीपर्यंत जाऊन पोचले. 

चौकशीवेळी तिने आपण आयुष्यात ठरवलेले ध्येय आपल्याला आत्तापर्यंत साध्य करता आले नाही, त्यातच नोकरीही नाही. त्यामुळे मानसिक खच्चीकरण झाल्याने आत्महत्येचा विचार मनात आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे समुपदेशन करून तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. तरुणीच्या आई-वडिलांनी पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ज्ञता व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women post on facebook about suicide attempt police find her