पिंपरीच्या महापौरपदी माई ढोरे यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

शहराच्या महापौरपदी भाजपच्या उषा ऊर्फ माई ढोरे यांची निवड झाली. त्यांना ८१ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती ऊर्फ माई काटे यांना ४१ मते मिळाली.

पिंपरी - शहराच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या उषा ऊर्फ माई ढोरे यांची निवड झाली. त्यांना ८१ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती ऊर्फ माई काटे यांना ४१ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उपमहापौरपदाचे उमेदवार राजू बनसोडे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने भाजपचे तुषार हिंगे बिनविरोध निवडून आले. शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीला, तर चार अपक्षांनी भाजपला साथ दिली. शिवसेनेचे तीन आणि अपक्ष, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रत्येकी एक असे सहा सदस्य अनुपस्थित राहिले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शहराचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी (खुला) आरक्षित आहे. भाजपने ढोरे यांना, तर राष्ट्रवादीने काटे यांना उमेदवारी दिली होती. उपमहापौरपदासाठी भाजपचे हिंगे व राष्ट्रवादीचे बनसोडे रिंगणात होते. दोन्ही पदांसाठी सोमवारी (ता. १८) नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी (ता. २२) महापालिकेची विशेष सभा घेऊन निवडणूक घेतली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल पीठासन अधिकारी होते. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव जगताप उपस्थित होते. भाजपचे पदाधिकारी भगवे फेटे घालून उपस्थित होते. प्रक्रियेचे छायाचित्रण करण्यात आले. 

अशी झाली निवडणूक
पीठासन अधिकारी गोयल यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली. चारही उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. ते सर्व वैध ठरले. सुरुवातीला महापौरपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करून माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला. कोणीही माघार न घेतल्याने आवाजी पद्धतीने मतदान झाले. गोयल यांनी काटे यांच्या बाजूने मतदान करू इच्छिणाऱ्यांनी उभे राहून नाव व प्रभाग क्रमांक सांगण्याचे आवाहन केले. त्यानुसार राष्ट्रवादीच्या ३६ पैकी ३५ आणि शिवसेनेच्या नऊपैकी सहा अशा ४१ नगरसेवकांनी मतदान केले. त्यानंतर ढोरे यांचे नाव पुकारण्यात आले. त्यांना भाजपच्या सर्व ७७ आणि पाचपैकी चार अपक्ष अशा ८१ नगरसेवकांनी मतदान केले. गोयल यांनी ढोरे यांना विजयी घोषित केले. 

उपमहापौरपदी हिंगे बिनविरोध
महापौरपद निवडणूक निकाल जाहीर केल्यानंतर पीठासन अधिकाऱ्यांनी उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. भाजपचे तुषार हिंगे आणि राष्ट्रवादीचे राजू बनसोडे रिंगणात होते. बनसोडे यांनी माघार घेत असल्याचे पीठासन अधिकाऱ्यांना लेखी कळविले.  त्यानंतर उपमहापौरपदी हिंगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे गोयल यांनी जाहीर केले.

बनसोडे सभागृहाबाहेर
राष्ट्रवादीच्या निर्णयानुसार आजी, माजी विरोधी पक्ष नेते अनुक्रमे नाना काटे व दत्ता साने यांनी उपमहापौरपदाचे उमेदवार राजू बनसोडे यांचा अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू केली. हे पाहून बनसोडे सभागृहाबाहेर पडले. त्यांना काही नगरसेवकांनी सभागृहात आणले. त्यानंतर माघारीच्या अर्जावर स्वाक्षरी करून बनसोडे यांनी तो पीठासन अधिकारी गोयल यांच्याकडे दिला. 

आमदारांकडून सत्कार
नवनिर्वाचित महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे यांचा भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात येऊन सत्कार केला. पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी अभिनंदन केले. माई यांच्या सून व मुलीने औक्षण करून पेढा भरविला.

शहरातील विकासकामांची कमतरता भरून काढणार आहे. राहिलेली विकासकामे व मावळते महापौर राहुल जाधव यांच्या कार्यकाळात निर्णय घेतलेली कामे पूर्ण करण्याला प्राधान्य देणार आहे. शहराचा अभ्यास करून नागरिकांचे स्वप्न साकारणार.
- उषा ढोरे, नवनिर्वाचित महापौर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Usha Dhere elected New mayor of PCMC