esakal | लसीकरण केंद्रावरच कोरोना संसर्गाचा धोका

बोलून बातमी शोधा

लसीकरण केंद्रावरच कोरोना संसर्गाचा धोका

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

लसीकरण केंद्रावरच कोरोना संसर्गाचा धोका
sakal_logo
By
टीम ई सकाळ

खळद - पुरंदर तालुक्यात ग्रामीण भागामध्ये अनेक गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र या लसीकरण केंद्रावर तोकडी कर्मचाऱ्यांची संख्या असल्याचे निदर्शनास येत आहे. लसीकरण केंद्रांवर होणाऱ्या गर्दीतूनच कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत याठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

सध्या असणाऱ्या लसीकरण केंद्रावरती आरोग्य विभागाचे कर्मचारी, निवडक ग्रामपंचायत कर्मचारी काम करत आहेत, मात्र या ठिकाणी लसीकरणासाठी परीसरातील गावातील नागरिकही येत आहेत व यामुळे येणाऱ्या नागरिकांची नाव नोंदणी व लस टोचणे याव्यतिरिक्त इतर सुविधांसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. सध्या लसीकरण केंद्रावराती मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी होत आहे, अशा वेळी येणारे नागरिक कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सचे व इतर सुरक्षिततेच्या उपाय योजनांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यांच्यावरती नियंत्रण राखण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही. लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी प्राथमिक ऑक्सिजन, तापमान याची तपासणीही होताना दिसत नाही व यामुळे संसर्गाचा धोका संभवतो.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

येत्या एक मे पासून १८ वर्ष वया पासून पुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे.याचा विचार करता मोठ्या प्रमाणावरती लसीकरण केंद्रावरती गर्दी होणार आहे, यासाठी आतापासुनच योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यामध्ये लसीचा पुरवठा वाढविणे, प्रत्येक येणाऱ्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करणे, होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेणे, सोशल डिस्टंसिंग पालन करणे, आरोग्य केंद्रांअंतर्गत येणाऱ्या गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच ग्रामपंचायत, महसुल, शिक्षण, विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेणे, सामाजिक संस्थांची मदत घेणे, अन्य सुरक्षिततेच्या उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

हेही वाचा - फायर सेफ्टी ऑडिट करून घ्या! पुण्यातील रुग्णालयांना आदेश

याबाबत पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तातडीने गटविकास अधिकारी अमर माने व तालुका वैद्यकीय अधिकारी विवेक आबनावे यांना याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. तसंच यावर उपाययोजना करण्यास सांगितले. तर गटविकास अधिकारी अमर माने यांनी याबाबत योग्य नियोजन करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार असल्याचे सांगितले.