esakal | खासगी, सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची होणार सोय

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
खासगी, सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची होणार सोय
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असताना आता खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, बँका अशा कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे ५० प्रस्ताव महापालिकेकडे आले आहेत.

लसीकरणाचा वेग वाढावा, तसेच केंद्रांवर होणारी गर्दी टाळावी, यासाठी महापालिकेने खासगी तसेच सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी संबंधित कार्यालयात पुरेशी जागा तसेच लसीकरणास पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या शंभरपेक्षा जास्त असणे आवश्‍यक आहे. सध्या शहरात अशा प्रकारे दोन कार्यालयांत लसीकरणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

हेही वाचा: ऑक्सिजन बेड उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु : चंद्रकांत पाटील

अशी पाठवा माहिती

कामाच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित कार्यालयाला लस घेणाऱ्याचे नाव, वय आणि ओळखपत्र ही सर्व माहिती पालिकेला vaccination.campus@gmail.com या संकेतस्थळावर पाठवावी लागते. महापालिकेचे पथक संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी करते. त्यानंतरच प्रस्तावास मान्यता दिली जाते. तसेच तेथे काम करणाऱ्यांना डेटा एन्ट्री व इतर कामाचे प्रशिक्षण दिल्यानंतर लसीकरण केले जाते.

सध्या शहरात दोन ठिकाणी असे केंद्र असून, सुमारे ५०० जणांचे लसीकरण झाले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे एका ठिकाणी १५ पेक्षा जास्त दिवस लसीकरण करता येत नाही; पण महापालिकेकडून दोन ते तीन दिवसांत लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

- डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

विद्यापीठात लसीकरण सुरू करावे, यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यानंतर पालिकेच्या पथकाने येऊन पाहणी केली. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही झालेले आहे. पुढील एक-दोन दिवसात विद्यापीठात लसीकरण सुरू होईल.

- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुण्यातील लसीकरण

  • ७ लाखांपेक्षा अधिक लस घेतलेले नागरिक

  • १०१ सरकारी केंद्र

  • ७१ खासगी केंद्र

  • १५०-२०० केंद्रावर दिवसाच्या लशी