Pune : लसीकरणाचा आलेख पुन्हा उंचावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

लसीकरणाचा आलेख पुन्हा उंचावला

पुणे : जिल्ह्यात ‘हर घर दस्तक’ मोहिमेमुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण काही अंशी वाढले आहे. दिवाळीदरम्यान कमी झालेल्या लसीकरणाचा आलेख पुन्हा उंचावत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे नोंदविण्यात आले.

पुणे जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ८३ लाख ४२ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यापैकी ७९ लाख ८७ हजार ९४४ (९६ टक्के) जणांनी पहिला डोस घेतला. तर, ४६ लाख ७७ हजार ०४१ (५९ टक्के) जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

लशीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा पहिला डोस झाल्यानंतर दुसरा डोस घेण्याची तारीख उलटून गेल्यानंतरही लसीकरण केंद्रावर आले नसलेल्या नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी ‘हर घर दस्तक’ ही मोहीम राज्यात सुरू केली आहे. त्या अंतर्गत लसीकरणास पात्र असूनही लस न घेतलेल्यांना कोरोना लसीकरणाबाबत जागृती करण्यात येत आहे.

दिवाळीच्या आधीपर्यंत आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळात दररोज सुमारे ७० हजारांपर्यंत लसीकरण होत असते. ते दिवाळीमध्ये २५ हजारांपर्यंत कमी झाले होते. ‘हर घर दस्तक’ मोहिमेमुळे हा आकडा ४० हजारांपर्यंत वाढल्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळाचे सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे आतापर्यंत लस न घेतलेल्या नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही रुग्ण अत्यवस्थ होत नाही. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची शक्यतो गरज पडत नाही. तसेच, लस घेणाऱ्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी आहे.’’

loading image
go to top