खवय्ये पुणेकरांनो, ऐकलंत का? आपलं `वैशाली` हाॅटेल सुरू झालयं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

तुर्तास सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेतच हॉटेल सुरू करण्याचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे.

पुणे : असंख्य पुणेकर मंडळींची सकाळ प्रसन्न करणारे, मित्र-मैत्रिणींच्या गप्पांचे फड रंगविणारे, सोबत गरमागरम इडली, वाफळलेली कॉफी...असा अफलातून योग्य जुळून आणणारे फर्ग्युसन रस्त्यावरचे वैशाली हॉटेल सुरू झाले आहे. मात्र, पुढचे काही दिवस पार्सल सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यातही आता बटाटा वडा, व्हेज कटलेट, साबुदाणा वडा, उत्तप्पा असे मोजकेच पदार्थ मिळणार आहेत.

 नवीन बांधकाम प्रकल्प नियमावलीत अडकले; जुनी वापरता येईना, तर नवीन प्रसिद्ध होईना!

तुर्तास सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेतच हॉटेल सुरू करण्याचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. वैशालीचे दार उघडल्याची बातमी पसरतात तिच्या अर्थात, तिथल्या खाद्यपदार्थांच्या चाहत्यांनी गर्दी करायला सुरवात केली. शेजारच्या बाकांवरचा कट्टा गजबजू लागला आणि पार्सलसाठी रांगा लागल्या. मात्र, हॉटेलमधल्या काऊंटरपासून कामगार सारेच मास्क, हॅण्डग्लोज वापरून सेवा पुरवत होते. तर त्यांना तितकाच प्रतिसाद देत, वैशालीचे चाहतेही सोशल डिस्टिन्सिंग पालन करताना दिसत होते.

पुण्यात गुंडाराज ; वर्चस्ववादातून लाॅकडाउनमधील तिसरा खून

 

 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

फर्ग्युसन रस्त्यावरील वैशाली हॉटेल हे पुणेकर खवय्यांचा अभिमानच. मात्र, पुण्यात कोरोनाने प्रवेश केला अन् लाॅकडाउन सुरू झाले. त्यामुळे हॉटेलचे शटरही लॉक झाले. गेली दोन-सव्वादोन महिने हॉटेल बंद राहिले. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये हाॅटेल सुरू होतील, याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पहिल्या टप्प्यात तसे झाले नाही आणि ते बंद राहिले. मात्र, ते सुरू करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाकडून तयारी करण्यात येत होती. त्यानुसार वैशालीतून पार्सल सुरू करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्राहकांनी सर्व पातळ्यांवर काळजी घेण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vaishali hotel start in pune fc road