‘वंदे भारत’ साठी पुणेकरांना वर्षाचा ‘थांबा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

express railway

पुणे -सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसला ‘वंदे भारत’चा रेक जोडला जाणार आहे.

‘वंदे भारत’ साठी पुणेकरांना वर्षाचा ‘थांबा’

पुणे - पुणे -सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसला ‘वंदे भारत’चा रेक जोडला जाणार आहे. मात्र, याचा प्रवास करण्यासाठी पुणेकरांना किमान वर्षभर तरी प्रतीक्षा करावी लागेल. कारण वंदे भारत धावण्यासाठी त्या योग्यतेचा ट्रॅक नाही. त्यामुळे पुणे -सोलापूर -सिकंदराबाद मार्गावर ट्रॅकचे अपग्रेडेशन करणे, घोरपडी शेडमध्ये कोच मेन्टेनन्स डेपो उभारणे आदी कामे करावी लागतील.

सर्वात महत्त्वाचे वंदे भारतच्या डब्याची देशात खूप कमतरता आहे. त्यामुळे हे डबे निर्माण होण्यासदेखील विलंब लागेल. लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्ट्रीमध्ये ऑगस्ट २२ पासून वंदे भारतच्या डब्यांचे उत्पादन होणार आहे.

रेल्वे बोर्डाने देशातील सर्व शताब्दी एक्सप्रेसचे जुने रेक काढून, त्याला वंदे भारत एक्स्प्रेसचे रेक जोडण्याचा निर्णय घेतला. यात पुणे- सिकंदराबाद शताब्दी समावेश आहे. मात्र, वंदे भारत लगेच धावेल, अशी सध्याची स्थिती नाही. त्यासाठी रेल्वेला किमान एक वर्षाचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

नुकतेच रेल्वे बोर्डने २०० वंदे भारतच्या डब्यांचे उत्पादन करण्याची ऑर्डर दिली आहे. यात काही डबे आयसीएफ तर काही डबे लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्ट्रीमध्ये उत्पादित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘वंदे भारत’च्या कोचच्या उत्पादनांवर भर दिला जात आहे. जसे डबे उपलब्ध होतील, तसा त्याचा वापर केला जाईल. पुणे -सिकंदराबाद शताब्दीला देखील तो वापरला जाईल.

- गौरव बन्सल, कार्यकारी संचालक, रेल्वे बोर्ड (प्रसिद्धी विभाग ), नवी दिल्ली.

रेल्वे बोर्डने दिलेला आदेश प्राप्त झाला असून, आयसीएफ व मराठवाडा कोच फॅक्ट्री विभागून डबे तयार होतील. काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. ती पूर्ण होताच डब्यांच्या उत्पादनास सुरवात होईल.

- जी व्यंकटेशन, जनसंपर्क अधिकारी, आयसीएफ, चेन्नई

टॅग्स :puneVande Bharat Railway