पितृपंधरवड्यात पितरांचा नैवेद्य अन् कावळ्याची प्रतीक्षा; बदलत्या काळाचे चित्र

पितृपंधरवड्यात पितरांचा नैवेद्य अन् कावळ्याची प्रतीक्षा; बदलत्या काळाचे चित्र
Published on: 

TVS26A00193
संग्रहित छायाचित्र.
---
कावळ्याच्या प्रतीक्षेत पितरांचा नैवेद्य!
कावळे कमी झाल्याने पितृपक्षातील पारंपरिक विधीला फटका
सकाळ वृत्तसेवा
तावशी, ता. २ : हिंदू धर्मपरंपरेत पितृपंधरवड्याला विशेष महत्त्व आहे. या काळात पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्ध करून नैवेद्य अर्पण केला जातो. पितरांना अर्पण केलेला नैवेद्य कावळ्याने शिवावा, अशी श्रद्धा असल्याने अनेक कुटुंबे सकाळपासून कावळ्याची प्रतीक्षा करतात. मात्र, परिसरात कावळे दिसण्याचे प्रमाण कमी झाल्याने नैवेद्याला कावळा मिळणे कठीण झाले आहे.
पितृपंधरवड्यात तिथीनुसार पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. घरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुरणपोळी, भात, भाजी आदी पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो. हा नैवेद्य घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा छतावर ठेवून कावळ्याची वाट पाहिली जाते. कावळ्याने नैवेद्य शिवला की पितरांनी तो स्वीकारला, अशी अनेकांची श्रद्धा आहे. मात्र, आता बराच वेळ प्रतीक्षा करूनही कावळा न आल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे.
पूर्वी अंगणात घास ठेवला की काही क्षणांत कावळा येत असे. आता मात्र बराच वेळ वाट पाहावी लागते, असे ग्रामस्थ सांगतात. काही कुटुंबांत कावळा न आल्यास नैवेद्य गायीला किंवा अन्य प्राण्यांना दिला जातो. त्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि बदलते पर्यावरण यांचा संबंधही या निमित्ताने चर्चेत आला आहे.
माणसाच्या कर्मकांडात आणि निसर्गाच्या स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कावळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी पावले उचलली पाहिजेत, असे ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी सांगितले.
---
झाडांची घटती संख्या, बदलती जीवनशैली कारणीभूत
शहरीकरण, वाढती बांधकामे, वृक्षतोड, कचरा व्यवस्थापनातील बदल आणि नैसर्गिक अधिवास कमी होणे यामुळे कावळ्यांसह अन्य पक्ष्यांवर परिणाम होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पूर्वी अंगण, झाडे, मंदिर परिसर आणि वाड्यांमध्ये सहज दिसणारे कावळे आता कमी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com