पुसद

पुसद
Published on

विकसित भारतासाठी
शेतकरी मजबूत हवा

राहुल नार्वेकर : पुसद येथे वसंतराव नाईक स्मृतिदिन सोहळा

दिनकर गुल्हाने
पुसद : ‘‘माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यातील शेतकऱ्याला स्वावलंबी व समृद्ध बनविण्याचे ध्येय बाळगले होते. ते साकार करण्यासाठी आज शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही. विकसित भारत घडवायचा असेल तर शेतकरी मजबूत झाला पाहिजे,’’ असे विचार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसदच्या वतीने आयोजित वसंतराव नाईक यांच्या ४७ व्या स्मृतिदिन समारंभात कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून नार्वेकर बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख उपस्थित होते. स्वागताध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी आमदार निलय नाईक, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार ख्वाजा बेग, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, नगराध्यक्ष मोहिनी नाईक, माजी नगराध्यक्ष अनिता नाईक, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, एसडीओ आशिष बिजवल, कृषिभूषण दीपक आसेगावकर, प्रा. गोविंद फुके, विजय जाधव, अनिरुद्ध पाटील, निळकंठ पाटील, बाळासाहेब कामारकर, नितीन भुतडा, डॉ. आरती फुपाटे, प्रवीण देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पाचही विभागांतील नऊ प्रगतिशील शेतकरी व दोन कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या वेळी नार्वेकर म्हणाले, की नाईक प्रतिष्ठानच्या या ४७ वर्षांच्या परंपरेने शेतकऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. एका शेतकऱ्याचा सत्कार झाला तरी त्या प्रोत्साहनातून संपूर्ण समाजाला फायदा होतो.
वसंतराव नाईक यांनी चार कृषी विद्यापीठांची स्थापना करून शेतीबद्दल संपूर्ण काळजी घेतली. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून दावोस येथे झालेल्या करारात ३० लाख कोटी रुपयांची परकीय थेट गुंतवणूक झाली. यापुढे कृषी क्षेत्रात गुंतवणूक व्हावी, शेतीतील संशोधन आणि विकासाला चालना देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशाला पुढे न्यायचे असेल तर शेतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी प्रा. दिनकर गुल्हाने यांनी संपादित केलेल्या ‘चतुरस्र’ या स्मरणिकेच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले
कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी देशातील अन्नधान्य, दूध उत्पादन, भाजीपाला व फळे या क्षेत्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी वसंतराव नाईक यांच्या सिंचन धोरण, महाबीजची स्थापना, रोजगार हमी योजना, कृषी विद्यापीठांची स्थापना आणि कृषी संशोधनाला चालना यावर भाष्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण व डॉ. माधवी गुल्हाने यांनी केले. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रा. गोविंद फुके यांनी आभार मानले.

गौरव पुरस्कारांचे मानकरी
- संतोष पन्हाळे, सात्रळ, जि. अहिल्यानगर
- अवंतिका विजय सुकळकर, पुणे
- यज्ञेश वसंतराव कातबने, धनगाव, जि. छत्रपती संभाजीनगर
- माउली जाधव, सातेफळ, जि. बीड
- संगीता वाल्मिक सांगळे, सत्यगाव, जि. नाशिक
- शशांक पाटील, तांदलवाडी, जि. जळगाव
- सुशांत मोहन नाईक, वेतोरे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
- गोपाल सूर्यभान भक्ते, पारडसिंगा, जि. नागपूर
- अशोक वानखेडे, सुकळी, जि. यवतमाळ

- कृषी संशोधन संस्था : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
- कृषी शास्त्रज्ञ : डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, नरसोबावाडी, जि. कोल्हापूर

फोटो ओळी :
पुसद, जि. यवतमाळ : शेतकरी लघुउद्योजिका अवंतिका विजय सुकळकर यांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. सोबत कुलगुरू डॉ. शरद गडाख, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, नीलय नाईक, धनंजय सोनी, किसनराव वानखेडे, अनिता नाईक, मोहिनी नाईक, विकास मीना.

पुसद : वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा कृषी गौरव पुरस्कार गोपाल भक्ते (पारडसिंगा, जि. नागपूर) यांना प्रदान करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. सोबत कुलगुरू डॉ. शरद गडाख, स्वागताध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी आमदार नीलय नाईक, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com