वाठार स्टेशन: वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात युती निश्चित नसल्याने नेते मंडळीसह कार्यकर्त्यांची डोकेदुखी वाढली.
वाठार स्टेशन गटात राजकीय ‘चक्रव्यूह’
नेत्यांमधील विसंवादामुळे कार्यकर्त्यांची चलबिचल, तिरंगी लढतीची चिन्हे
अतुल वाघ ः सकाळ वृत्तसेवा
वाठार स्टेशन, ता. २० : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळींमध्ये अद्याप एकमत होत नसल्याने कार्यकर्ते उमेदवारीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. पक्षाने घेतलेला निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांना पटेलच याची शाश्वती नसल्याने या गटात मोठी बंडाळी किंवा अनपेक्षित राजकीय समीकरणे पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.
वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे, तर वाठार स्टेशन गणासाठी सर्वसाधारण महिला आणि अंबवडे संमत वाघोली गणासाठी ओबीसी पुरुष असे आरक्षण पडले आहे. या आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना बाजूला व्हावे लागले असून, नवीन चेहऱ्यांचा शोध घेताना नेत्यांची दमछाक होत आहे. राष्ट्रवादीतून जिल्हा परिषदेसाठी किन्हई येथील जयश्री राजेंद्र भोसले यांचे नाव आघाडीवर आहे, तर अंबवडे संमत वाघोली गणातून ओबीसी उमेदवार न मिळाल्यास, कुणबी दाखल्याच्या आधारे नीलेश जगदाळे यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते. आमदार महेश शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेसाठी सुनीता धनाजी मोहिते आणि स्वाती अभय तावरे या दोन प्रबळ दावेदारांमध्ये रस्सीखेच आहे. पंचायत समितीसाठी बिचुकले येथील दीपाली शिवाजी पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
या गटात सर्वात मोठी चर्चा आमदार महेश शिंदे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वादाची आहे. हे दोन्ही नेते एकत्र न आल्यास, रणजितसिंह निंबाळकर स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचे संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास जिल्हा परिषदेसाठी वाघोली येथील सुषमा शहाजी भोईटे आणि पंचायत समितीसाठी सारिका नितीन चव्हाण निवडणूक लढवू शकतात. यामुळे या गटात ‘राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट विरुद्ध राजे गट’ अशी तिरंगी लढत होऊन मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होण्याची शक्यता आहे.
वाठार स्टेशन, तडवळे संमत वाघोली, जाधववाडी, विखळे यांसारखी गावे फलटण विधानसभा मतदारसंघात येतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पराभवाचा धक्का बसला असला, तरी या गावांवरील त्यांची पकड अद्याप सैल झालेली नाही. त्यामुळे वाठार स्टेशन गणाच्या उमेदवारीसाठी ते आपला आग्रह धरणार हे निश्चित आहे, ज्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा पेच अधिक वाढू शकतो. नेत्यांच्या स्तरावर सुरू असलेल्या या राजकीय खेळींमुळे सामान्य कार्यकर्ता मात्र गोंधळात आहे. वरिष्ठांनी घेतलेला निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांना मान्य नसेल, तर ‘क्रॉस वोटिंग’चा धोका सर्वच पक्षांना सतावत आहे. एकूणच, वाठार स्टेशन गटाची ही निवडणूक कोणत्याच पक्षासाठी ‘केकमॉक’ नसेल, हेच सध्याचे चित्र सांगत आहे.
फोटो- रामराजे, नितीन पाटील, महेश शिंदे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

