

विमा कंपनीस वाहन मालकास भरपाई देण्याचा आदेश
अहिल्यानगर, ता. २० ः अपघातात वाहन मालकाच्या झालेल्या नुकसानीची रक्कम एक लाख ५७ हजार रुपये तसेच त्यावर २७ सप्टेंबर २०१८ पासून रक्कम मिळेपर्यंत नऊ टक्के व्याज व तक्रारीच्या खर्चासाठी ७ हजार व शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासासाठी १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, सदस्या चारू डोंगरे, संध्या कसबे यांनी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना दिला आहे.
अमोल साखरे यांच्या वाहनाला १८ ऑगस्ट २०१८ रोजी अहिल्यानगर-मनमाड रोडवर अपघात झाला. त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. वाहन दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीच्या शो-रूमला लावण्यात आलेले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल दिला होता. मात्र, विमा कंपनीने नंतर भरपाई नाकारली होती. वाहनाच्या विमा पॉलिसीमध्ये विमा उतरविताना नो बोनस क्लेम घेतलेला असल्यामुळे वाहनास नुकसान भरपाई देता येत नाही, असे कारण सांगून विमा नाकारला होता.
त्याविरुद्ध साखरे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अहिल्यानगर यांच्याकडे ज्येष्ठ विधिज्ञ गोरक्ष पालवे यांच्या मार्फत तक्रार दाखल केलेली होती. तक्रारीची सुनावणी होऊन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने भरपाई देण्याचा आदेश दिला.
इफको टोकियो जनरल इन्शरन्स कंपनी लिमिटेड यांनी वाहनाचे नुकसानीची रक्कम म्हणून एक लाख ५७ हजार रुपये तसेच या रकमेवर २७ सप्टेंबर २०१८ पासून रक्कम प्रत्यक्ष मिळेपर्यंत नऊ टक्के व्याज, शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासासाठी १० हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चासाठी सात हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे. तक्रारदार अमोल साखरे यांच्या वतीने ॲड. गोरक्ष पालवे यांना ॲड. गुरविंदर पंजाबी, ॲड. सागर गर्जे, ॲड. रोहित बुधवंत, ॲड. राहुल दहिफळे, ॲड. विशाल वांढेकर यांनी सहाय केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.